जमीन मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक
By Admin | Published: May 15, 2017 12:27 AM2017-05-15T00:27:02+5:302017-05-15T00:27:02+5:30
बुलडाणा : शासकीय जमीन मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासह तिच्या पतीने देऊळघाट येथील एका महिलेची तीन लाखांनी फसवणूक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शासकीय जमीन मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासह तिच्या पतीने देऊळघाट येथील एका महिलेची तीन लाखांनी फसवणूक केली आहे.
या प्रकरणी सदर महिलेने १० मे रोजी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे; परंतु चार दिवसांचा कालावधी उलटून गेला असतानादेखील पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे या फसवणूक प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी जोत्सना मो. जावेद यांनी केली आहे.
पोलीस विभागात कार्यरत असलेल्या निर्मला सुखदेव जाधव यांनी माझे पती सुखदेव जाधव यांचे मंत्रालयात व इतर अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे तुम्हाला बुलडाणा शहरातील गट नंबर ६३ मधील पाच एकर ई - क्लास जमीन मिळवून देतो, असे सांगून तुम्हाला माझा पतीस तीन लाख रुपये द्यावे लागतील. जमीन मिळवून दिली नाही, तर तुमचे पैसे परत करू व बाँड पेपरवर लिहून देऊ, असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून देऊळघाट येथील ज्योत्स्ना मो. जावेद यांनी तीन लाख रुपये देऊन बाँड पेपरवर करार करून घेतला; परंतु तीन वर्षांचा कालावधी उलटून गेला असतानादेखील त्यांना जमीनच काय; परंतु पैसेसुद्धा देण्यात आले नाहीत. पैसे परत मागितले असता पती-पत्नीने लोटपाट करून तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आत टाकू, अशी धमकी दिली.
अखेर शेवटी ज्योत्स्ना मो. जावेद यांनी १० मे रोजी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त पती-पत्नी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे; परंतु गुन्हा दाखल होऊन चार दिवसांचा कालावधी उलटून गेला असतानादेखील पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. निर्मला जाधव या पोलीस विभागात असल्यामुळे त्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोपही सदर महिलेने केला आहे. त्यामुळे या फसवणूक प्रकरणातील आरोपींना अटक करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ज्योत्स्ना मो. जावेद यांनी केली आहे.