अवैध सावकाराच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या; मेहकरात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By संदीप वानखेडे | Published: October 28, 2023 03:31 PM2023-10-28T15:31:09+5:302023-10-28T15:31:16+5:30
या मानसिक छळामुळे तिने १८ ऑक्टोबर रोजी घरी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
मेहकर : प्लॉट घेण्यासाठी अवैध सावकारांकडून घेतलेले पैसे परत करण्यासाठी सावकारांनी केलेल्या मानसिक छळातून एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध मेहकर पोलिसांनी २७ ऑक्टाेबर राेजी रात्री गुन्हा दाखल केला आहे. शबाना फिरोज शेख (वय ३७) असे मृतक महिलेचे नाव आहे़
मृतक महिलेचा पती फिरोज शेख वादामिया (रा. मेहकर) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची पत्नी शबाना फिरोज शेख हिने प्लॉट खरेदी करण्यासाठी शबाना शेख रशीद (रा. जानेफळ वेस, मेहकर), बाबाखान जफरखान (रा. बागवनपुरा, मेहकर) आणि रोहन शिंदे (रामनगर, मेहकर) यांच्याकडून रक्कम व्याजाने घेतली. रकमेच्या परतफेड करण्यासाठी वर नमूद तिघांनी माझ्या पत्नीला सतत मोबाइलवर कॉल करून आणि घरी येऊन धमक्या दिल्या.
त्यामुळे या मानसिक छळामुळे तिने १८ ऑक्टोबर रोजी घरी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर मेहकर, संभाजीनगर येथे उपचार करण्यात आले. परंतु तिचा २७ ऑक्टाेबर रोजी मृत्यू झाला. तिघा आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी फिरोज शेख यांनी केली. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी तिन्ही अवैध सावकारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी गणेश कडू करीत आहेत.