कोरोनामुळे महिलेचा मृत्यू, २२ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:23 AM2021-07-11T04:23:52+5:302021-07-11T04:23:52+5:30
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शेगाव तालुक्यातील ९, देऊळगाव राजा एक, चिखली सात, मेहकर एक, जळगाव जामोद तीन आणि सिंदखेड राजा तालुक्यातील ...
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शेगाव तालुक्यातील ९, देऊळगाव राजा एक, चिखली सात, मेहकर एक, जळगाव जामोद तीन आणि सिंदखेड राजा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. दुसरीकडे बुलडाणा, खामगाव, मलकापूर, नांदुरा, लोणार, मोताळा आणि संग्रामपूर तालुक्यांतील तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. दरम्यान, बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयामध्ये शनिवारी ढालसावंगी येथील ७० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला. २० जणांनी शनिवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, कोरोना संदिग्धांच्या तापासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी आजपर्यंत ५ लाख ९९ हजार ७५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ८६ हजार ३३९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. अद्यापही १ हजार ६९६ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ८७ हजार ८१ झाली आहे. यापैकी ७७ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ६६५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.
--रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९९.१५ टक्के---
कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९९.१५ टक्क्यांवर पोहोचले आहे. सोबतच मृत्युदरही सध्या ०.७६ टक्के आहे. पॉझिटिव्हिटी रेटही आता १२.४८ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यास एक प्रकारे दिलासा देणारी परिस्थिती आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६ लाख ९७ हजार ८८१ संदिग्धांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.