हाणामारीत जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:32 AM2021-02-12T04:32:30+5:302021-02-12T04:32:30+5:30
याप्रकरणी शंकर साबळे यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी समाधान मोरे, दिनेश खिल्लारे, आकाश खिल्लारे, ...
याप्रकरणी शंकर साबळे यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी समाधान मोरे, दिनेश खिल्लारे, आकाश खिल्लारे, बबन जाधव यांच्यासह जवळपास दहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी भगवान समाधान मोरे, रितेश खिल्लारे, आकाश कंकाळ या तिघांना अटक करण्यात आली असून असून सध्या हे तिघेही पोलीस कोठडीत आहे.
या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती अशी की, शंकर साबळे व त्यांचे कुटुंबीय हे ९ फेब्रुवारी रोजी रात्री एका नातेवाईकाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून परत येत होते. त्यावेळी कुत्र्यास हाकलण्याच्या कारणावरून मोरे गटातील व्यक्तींनी लाठ्याकाठ्यांनी त्यांना मारहाण केली. त्यात शंकर साबळे यांच्या कुटुंबातील कांता साबळे व अन्य काही जण जखमी झाले होते. त्यामुळे गंभीर जखमी असलेल्या कांता साबले यांना त्वरित अैारंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. ही हाणामारीची घटना ९ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० ते ११ वाजेच्या दरम्यान घडली होती. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी भीमनगर गाठत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. याप्रकरणी शंकर साबळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोरे कुटुंबातील व्यक्तींसह त्यांचे नातेवाईक अशा दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. सोबतच अटक करण्यात आलेल्या भगवान समाधान मोरे, रितेश खिल्लारे आणि आकाश कंकाळ यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
या प्रकरणात गैरकायद्याची मंडळी जमवून जीवघेणी मारहाण करण्यासोबतच आता खुनाचा गुन्हाही दाखल होण्यची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली. मृत महिलेच्या पार्थिवावर सध्या अैारंगाबाद येथील घाटी रुग्णालयात असून शवविच्छेदनानंतर ते कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरू व त्यांचे सहकारी करत आहेत.