भंगार साहित्य ठेकेदाराकडून मजूर महिलेचा विनयभंग
By सदानंद सिरसाट | Published: January 30, 2024 05:44 PM2024-01-30T17:44:18+5:302024-01-30T17:44:52+5:30
शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव : नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये काम करणाऱ्या मजूर महिलेसोबत भंगार साहित्य विकत घेणाऱ्या ठेकेदाराने गैरवर्तन करत विनयभंग केल्याचा प्रकार सोमवारी घडला. याप्रकरणी तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील ३५ वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यामध्ये ती डम्पिंग ग्राऊंडवर मजुरीने काम करते. या ठिकाणावरून भंगार साहित्य विकत घेण्याचा ठेका घेतलेला जमील खान अताउल्लाखान (रा. सजनपुरी) हा वेळेच्या अगोदर त्या ठिकाणी येतो, तसेच काम करणाऱ्या महिलांना लाजवेल, अशा भाषेत बोलून हावभाव करतो. दरम्यान, सोमवारी त्याने या ठिकाणी फिर्यादी महिलेशी गैरवर्तन करत तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. माझ्या सोबत चल, तुला राणी बनवतो असे म्हणून त्याने महिलेचा विनयभंग केला.
महिलेने विरोध केला असता त्याने तिला जातिवाचक व अश्लील शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी जमील खान अत्ताउल्लाखान यांच्याविरुध्द कलम ३५४, ३५४ (अ), २९४, ५०६ भादंवि सहकलम ३ (१) (डब्ल्यू) (आय) ३, (आय) (आर) (ड) ३ (२) (व्हीए) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
महिलेच्या नातेवाइकांनी आरोपीचे दुकान पेटविले
या घटनेमुळे संतप्त झालेल्या पीडित महिलेच्या नातेवाइकांनी सोमवारी रात्री आरोपीचे शहरातील भंगार साहित्याचे दुकान पेटवून दिले. याबाबत आरोपीच्या पत्नीने शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्यावरून याप्रकरणी तिघांवर कलम ४३५, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.