चार तास महिलेचे टॉवरवर चढून आंदोलन, पतीविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप
By ब्रह्मानंद जाधव | Published: March 10, 2023 07:04 PM2023-03-10T19:04:16+5:302023-03-10T19:05:08+5:30
मेहकर : तालुक्यातील सारंगपूर येथील गजानन बोरकर यांच्या विरुद्ध मेहकर पोलिस स्टेशनमध्ये खोटे गुन्हा दाखल केले आहेत, असा आरोप ...
मेहकर : तालुक्यातील सारंगपूर येथील गजानन बोरकर यांच्या विरुद्ध मेहकर पोलिस स्टेशनमध्ये खोटे गुन्हा दाखल केले आहेत, असा आरोप त्यांच्या पत्नी रुक्मिणी बोरकर यांनी केला आहे. या प्रकरणी मेहकर पोलिसांच्या निषेधार्थ महिलेने १० मार्च रोजी तहसील कार्यालय परिसरातील टॉवरवर चढून आंदोलन केले.
चार तासापेक्षाही अधिक वेळ टॉवरवर चढल्यानंतर अनेकांच्या विनंतीवरुन त्यांनी दुय्यम ठाणेदार नागरिक यांच्यासमक्ष आंदोलन मागे घेतले. सारंगपूर येथील गजानन बोरकर यांच्याविरोधात त्यांच्याच गावातील एका महिलेने विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली. त्यावरुन स्थानिक पोलिस प्रशासनाने गजानन बोरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा गुन्हा पोलिस प्रशासनाने मुद्दामहून दाखल केल्याचे गजानन बोरकर यांच्या पत्नी रुक्मिणी बोरकर यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाच्या निषेधार्ध रूक्मिणी बोरकर यांनी शुक्रवारी सकाळी सात वाजता स्थानिक तहसीलमधील टॉवरवर चढून आंदोलन केले. गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिस निरिक्षक निर्मला परदेशी, सहाय्यक पोलिस निरिक्षक अशोक जायभाये, शेख नबी यांना निलंबित करेपर्यंत टॉवरवर बसून आंदोलन सुरुच ठेवणार, असा पवित्रा रुक्मिणी बोरकर यांनी घेतला होता. सुमारे चार तासांपेक्षा अधिक वेळ टॉवरवर आंदोलन करुन अनेकांच्या विनंतीस्तव त्यांनी आंदोलन मागे घेतले. या घटनेमुळे स्थानिक पोलिस प्रशासन हादरले होते. यावेळी तहसीलदार संजय गरकल यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधून याप्रकरणाची माहिती दिली.
मेहकर पोलीस ठाण्याच्या कारभाराचा प्रश्नचिन्ह
महिलेच्या या आक्रमक आंदोलनामुळे मेहकर पोलीस स्टेशनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मेहकरच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी ह्या नेहमीच वादग्रस्त ठरत आहेत. मेहकर पोलीस स्टेशनच्या कारभाराविरोधात यापूर्वी सुद्धा एका महिलेने विष प्रशन केले होते. आंदोलन कर्त्या महिलेवर मेहकर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.