सायाळा येथील ‘त्या’ महिलेचा खूनच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:11 AM2017-11-18T02:11:56+5:302017-11-18T02:12:25+5:30
सिंदखेडराजा: तालुक्यातील सायाळा येथील महिलेचा गळा आवळून खूनच झाला असून, साखरखेर्डा पोलिसांनी मुख्य आरोपीस अटक केली आहे. त्यास न्यायालयासमोर उभे केले असता २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: तालुक्यातील सायाळा येथील महिलेचा गळा आवळून खूनच झाला असून, साखरखेर्डा पोलिसांनी मुख्य आरोपीस अटक केली आहे. त्यास न्यायालयासमोर उभे केले असता २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत सायाळा येथे १0 नोव्हेंबर रोजी नर्मदा कुंडलिक लंबे (६५) ही महिला दुपारी बेपत्ता झाल्याची तक्रार ११ नोव्हेंबरला साखरखेर्डा पोलिसांमध्ये उद्धव अशोक लंबे यांनी दिली. परिसरात तिचा शोध घेतला असता ती सापडली नाही. या महिलेच्या अंगावर दागिने असल्याने तिचा खूनच झाला असावा, असा संशय ग्रामस्थ आणि कुटुंबीयांना होता. खेडेगाव आणि शेतात काम करणारी मंडळी असल्याने गावात एकप्रकारे शुकशुकाट होता. १0 नोव्हेंबरला शौचास जाण्यासाठी नर्मदा लंबे ह्या जवळच्या पडक्या वाड्यात गेल्या असाव्यात. त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या गजानन संजाबराव अव्हाळे (२८ रा. सायाळा) याने नर्मदाबाईचा पाठलाग करून अव्हाळे यांच्या पडक्या वाड्यात गाठले. दोरीच्या साह्याने गळा आवळून तिला ठार मारले आणि अंगावरील दागिन्यांसह गावातून फरार झाला. खून झाल्यानंतर तब्बल तिसर्या दिवशी नर्मदाबाईचा मृतदेह अव्हाळे यांच्या पडक्या वाड्यात मिळून आला. त्वरित उद्धव लंबे यांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन शिंदे यांना माहिती दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीणा, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सचिन शिंदे, पोहेकाँ प्रकाश मुंढे, अशोक काशिकर, पोकाँ राजेश मापारी, स्था.गु. शाखेचे शेषराव अंभोरे यांनी तपास करून मुख्य आरोपीचा शोध घेतला आणि १७ नोव्हेंबरला सकाळी गजानन संजाबराव अव्हाळे याला अटक केली. कलम ३0२, ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करून ठाणेदार सचिन शिंदे यांनी सिंदखेडराजा न्यायालयात हजर करून २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली. पुढील तपास सचिन शिंदे करीत आहेत.