बसमधून महिलेची ४ तोळे सोन्याची पोथ लंपास; प्रवाशांसह बस लावली खामगाव शहर पोलीस स्टेशनला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 11:01 PM2023-09-08T23:01:20+5:302023-09-08T23:01:47+5:30
या ठिकाणी बसमधील प्रवाशांची चौकशी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.
खामगाव: धावत्या बसमध्ये अकोला येथील एका शिक्षिकेची ४ तोळे सोन्याची पोथ आणि नगदी ४ हजार रूपये चोरी गेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उजेडात आली. यावेळी चांगलाच गोंधळ वाढल्यामुळे चालक आणि वाहकाने प्रवाशांसहीत एसटीबस खामगाव शहर पोलीस स्टेशनला आणली. या ठिकाणी बसमधील प्रवाशांची चौकशी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.
शिक्षिका असलेल्या उषा प्रकाश नेमाडे (५३, रा. मलकापूर, अकोला) बुलढाणा येथे नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपल्यानंतर आपल्या काही नातेवाईकांसह त्या बुलडाणा येथील बसस्थानकावर एमएच ४० एक्यू ६३३९ या बुलढाणा शेगाव बसमध्ये चढल्या. तिकीट काढण्यासाठी पर्स शोधताना ४ हजार रूपयांसह पर्स गायब असल्याने उषा नेमाडे यांना धक्का बसला. या धक्क्यातून सावरत नाही तोच, नेमाडे यांच्या गळ्यातील अडीच लाख रूपये किंमतीची ४ तोळे सोन्याची पोथ चोरी गेल्याचे निदर्शनास आले. तसेच बुलढाणा येथील संगम चौकाच्यापुढे हा प्रकार लक्षात येताच, बसमध्ये चांगलाच बसमध्ये एकच गोंधळ उडाला.
सुरूवातीला बोथा येथे बसमधील प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलीस तक्रार देण्यासाठी तसेच पुढील कारवाईसाठी चालक आणि वाहकाने थेट बस खामगाव शहर पोलीस स्टेशनला आणली. बसमध्ये ७९ प्रवाशी असल्याचे वाहक पवार यांनी सांगितले. याठिकाणी चौकशी केल्यानंतर बस आणि प्रवाशांना सोडून देण्यात आले. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली होती.