विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
By Admin | Published: October 1, 2016 06:24 PM2016-10-01T18:24:38+5:302016-10-01T18:24:38+5:30
नवरात्रोत्सवानिमीत्त घराची साफसफाई करीत असतांना विद्युत प्रवाहीत कुलरला धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला.
ऑनलाइन लोकमत
मलकापूर, दि. १ - नवरात्रोत्सवानिमीत्त घराची साफसफाई करीत असतांना विद्युत प्रवाहीत कुलरला धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला. तर वीजेचा धक्का लागलेल्या मातेला स्पर्श केल्याने दोन मुले सुध्दा गंभीर झाली. ही घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंपळखुटा बुलडाणा येथे घडली.
सौ.छाया पांडूरंग म्हैसागर (वय ४५) ही महिला नवरात्रोत्सवनिमीत्त शनिवारी सकाळी घरातील साफ-सफाईचे काम करीत असताना तिचा घरातील विद्युत प्रवाहीत झालेल्या कुलरला धक्का लागला. दरम्यान आईला अचानक काय झाले हे पाहण्याकरिता घरात असलेली त्यांची मुलगी कु.नेहा (वय १६) व मुलगा ऋषीकेश (वय १३) हे दोघेही मातेकडे धावत आले. दरम्यान त्यांनाही कुलरच्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागला.
ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी तिघांना तात्काळ मलकापूर येथे उपचारार्थ दाखल केले. दरम्यान सौ.छाया म्हैसागर यांची उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. तर कु.नेहा व ऋषीकेश म्हैसागर या बहीण भावावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ऐन नवरात्रोत्सवा दरम्यान घटस्थापना दिनी सदर दुदैवी घटना घडल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.