उन्हाळी वाळवणासाठी महिलांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:36 AM2021-04-09T04:36:12+5:302021-04-09T04:36:12+5:30
लोणार : उन्हाळा सुरू झाला की ग्रामीण भागात मसाले त्याचबरोबरीने लोणची, पापड यासारखे वर्षभरासाठी वाळवणाचे उन्हाळी खाद्यपदार्थ बनविण्यासाठी महिलांमध्ये ...
लोणार : उन्हाळा सुरू झाला की ग्रामीण भागात मसाले त्याचबरोबरीने लोणची, पापड यासारखे वर्षभरासाठी वाळवणाचे उन्हाळी खाद्यपदार्थ बनविण्यासाठी महिलांमध्ये लगबग दिसून येते. लोणार परिसरात महिलांची आता वाळवणी पदार्थ बनविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
पूर्वी शेती मशागतीतून उसंत मिळताच व पुढे लग्न कार्य असल्यास किंवा हातचे पदार्थ म्हणून गव्हापासून शेवया, कुरवड्या, बाजरीपासून खारोड्या वडे, ज्वारीपासून पापड, तांदळापासून पापड, चकल्या, उडीदापासून वडे, पापड, मुगाची डाळ मूगवड्या, बटाट्यापासून चिप्स, चकल्या, साबुदाना चिप्स, चकल्या, आदी वाळवणाचे पदार्थ वर्षभर घरात वेगवेगळ्या वेळी किंवा सणावारासह उपवासासाठी तळून वापरले जातात. हा वाळवणा प्रत्येक घरात असावा यासाठी महिलांची धडपड असते. खरीप, रब्बी पिके घरात काढून आणल्यानंतर उष्ण ऋतूमध्ये शेती मशागत कामे थांबताच महिला या उन्हाळी वाळवणी पदार्थ बनविण्यासाठी कामाला लागतात. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी उन्हाळी पदार्थांचा रंगबेरंगी थाट सजल्याचे चित्र अनेकांच्या दारी पाहायला मिळते. त्यामुळे गावातील महिला वर्गाचा उन्हाळी वाळवणासाठी एकत्रित कामेही करताना दिसतात. तसेच गरजू महिलांना वाळवणासाठी आणि मसाला विक्रीतून अर्थाजन होत असते. त्यात लोणची, पापड, विविध मसाले, कुरडई, उपवासाचे वाळवण हा सारा खाद्यपदार्थांचा पसारा दिसतो. ग्रामीण भागात महिला हे पदार्थ घरीच तयार करीत असतात. आता शेवया तयार करण्याचे यंत्र आले असून, त्यामुळे रोजगार तयार झाला आहे. काही महिला रोजंदारीवर मदत करीत असल्याने त्यांना रोजगार मिळाला आहे.