‘उभ्या बाटली’साठी पुरुषांसह महिलांचीही हात वर करून संमती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:25 PM2018-12-21T17:25:39+5:302018-12-21T17:26:12+5:30
दारू बंदीसाठी नव्हे; तर दारू दुकान सुरू करण्यासाठी शेकडो माहिला पुरूषांनी हातवर करून संमती दिल्याचा अनोखा प्रकार बिबी ग्रामपंचायतमध्ये पाहावयास मिळाला.
बिबी: दारू बंदी करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये आंदोलन, ग्रामसभेत ठराव, पोलिस स्टेशनला ठिय्या यासारखे अनेक प्रकार आतापर्यंत आपण पाहिले. परंतू येथे दारू बंदीसाठी नव्हे; तर दारू दुकान सुरू करण्यासाठी शेकडो माहिला पुरूषांनी हातवर करून संमती दिल्याचा अनोखा प्रकार बिबी ग्रामपंचायतमध्ये पाहावयास मिळाला. येथील ग्रामपंचायतमध्ये १९ व २० डिसेंबरला झालेल्या ग्रामसभेत दारू दुकान सुरू करण्याचा ठराव घेण्यात आला.
ग्रामसभेत गावात देशी, विदेशी दारूचे दुकान आणण्याचा ठराव होणार असल्याची कुणकुण येथीलच सामाजिक क्षेत्रात काम करणाºया काही महिलांना लागली होती. त्यामुळे त्यांनी गावात होणारी ग्रामसभा ही गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत व्हावी, तसेच संपूर्ण ग्रामसभेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात यावे, अशी मागणी दारूबंदी आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली होती. त्या निवेदनाच्या प्रती त्यांनी संबंधित तहसीलदार ते राष्ट्रपती पर्यंत पाठविल्या होत्या. त्यामुळे १९ डिसेंबर रोजी होणाºया ग्रामसभेबाबत गावात व आसपासच्या परिसरात हा चर्चेचा विषय बनला होता. यामुळे या ग्रामसभेकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. या सभेमध्ये विरोध होऊन ही सभा विशेष होईल असे वाटत असताना, ग्रामसभेच्या दिवशी सभेला गावातील उपस्थित एकाही स्त्री व पुरुष यांनी विरोध दर्शविला नाही. आणि ज्यांनी या ग्रामसभेच्या ठरावास विरोध दर्शवून राज्य उत्पादन शुल्क आयुक्त मुंबई यांना निवेदन दिले होते, त्या सामाजिक कार्यकर्ता महीला ग्रामसभेकडे फिरकल्या सुद्धा नाही. ग्रामसभेत गावात नवीन तीन ते चार देशी व विदेशी दारूच्या दुकानांना परवानगी देण्याचे ठराव संमत करण्यात आले. त्यांनी १९ डिसेंबर रोजी फक्त महिलांची सभा घेण्यात आली. त्यात ३२३ महिलांनी आपला सहभाग नोंदवून सर्वच महिलांनी ठरावाच्या अनुकूल बाजूने आपले मत सही व अंगठा देऊन नोंदविले. त्यानंरत २० डिसेंबर रोजी पुरुषांच्या ग्रामसभेत २०८ जन हजर होते व त्यांनीही ठरावाच्या बाजूने आपले मत नोंदविले. कारण चोरून-लपून विकल्या जाणाºया ५० रुपयांच्या बाटलीचे त्यांना शंभर रुपये मोजावे लागत होते. ते आता त्यांना पन्नास रुपयातच मिळणार असल्याने तळीरामांचे अच्छे दिन येणार एवढे मात्र निश्चित! ग्रामसभा घेण्यासाठी पंचायत समिती लोणार येथून कृषी अधिकारी एस. एन. सुरडकर, विस्तार अधिकारी नेमाडे यांची उपस्थिती होती. तर पीएसआय महाडीक, पीएसआय माळी, पोलीस कॉन्स्टेबल गीते, टेकाळे, गवई, परशुवाले, पवार यांच्या सह महीला पोलीस कर्मचाºयांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. २० डिसेंबरच्या ग्रामसभेला जिल्हा परिषद सदस्य राजूभाऊ इंगळे यांची सुद्धा उपस्थिती होती.
पोलिस बंदोबस्तात ग्रामसभा
बिबी येथे १९ व २० डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेतील सर्व विषय पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडले. जवळ पास ३ हजार ५०० मतदार असलेल्या या गावात ५३१ स्त्री व पुरुषांनी आपले मत नोंदवून दारु विक्रीला बिनविरोध संमती दर्शविली.
दारू दुकान सुरू करण्यासाठी माहिला व पुरूषांनी हातवर करून ठरावाला मान्यता दिली. यामध्ये एकाही माहिलेने दारू विक्री विरोधात तक्रार केली नाही.
- गजानन कावरखे, ग्रामसवेक बिबी.