पाणी टंचाईबाबत रेखा प्लॉट भागातील महिलांची पालिकेवर धडक
By अनिल गवई | Published: January 29, 2024 02:36 PM2024-01-29T14:36:37+5:302024-01-29T14:37:00+5:30
निवेदनात नमूद केले की, शहरातील रेखा प्लॉट हा भाग खूप जुना आणि स्थायी भाग असून, या भागातील मुलभूत समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते.
खामगाव: शहरातील रेखा प्लॉट भागातील नागरिकांना गत २० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. पाणी टंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसून, नवीन नळ जोडणी देण्यास विलंब होत असल्याने रेखा प्लॉट भागातील महिलांनी सोमवारी दुपारी पालिकेवर धडक दिली. त्यानंतर मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केले की, शहरातील रेखा प्लॉट हा भाग खूप जुना आणि स्थायी भाग असून, या भागातील मुलभूत समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते. गत २० वर्षांपासून या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. २० वर्षांपासून नळ जोडणी नसल्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागते. या वस्तीतील काही भागात नवीन पाइपलाइनची जोडणी करण्यात आली आहे. मात्र, या पाइपलाइनवरून अद्यापपर्यंतही नळ जोडणी करण्यात आलले नाही.
येत्या सात दिवसांच्या आत परिसरातील पाण्याची समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला. यावेळी संतप्त महिलांनी नगर पालिकेत निदर्शनेही केली. निवेदनाच्या प्रती आमदार आकाश फुंडकर आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांना देण्यात आल्या. या निवेदनावर रेखा प्लॉट भागातील महिला आणि नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.