दारूबंदी झालीच पाहिजे म्हणत महिलांनी गाठले पोलिस ठाणे
By भगवान वानखेडे | Published: April 2, 2023 04:26 PM2023-04-02T16:26:10+5:302023-04-02T16:26:43+5:30
बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशन तांदुळवाडी गावातील महिलांचा एल्गार
बुलढाणा : तालुक्यातील तांदुळवाडी येथील महिलांनी गावातील दारू विक्री बंद झाली पाहिजे, या मागणीसाठी थेट पोलिस स्टेशन गाठून पोलिस प्रशासनाला धारेवर धरले. एवढेच नव्हे तर गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त करून ते साहित्य पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आल्या. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांमुळे पोलिस स्टेशनचा परिसर दणाणून गेला होता. हा सगळा प्रकार २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडला.
बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या तांदुळवाडी गावात मागील काही वर्षांपासून गावठी दारू विकली जात आहे. यामुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी गेले असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. ही होत असलेली अवैध गावठी दारू विक्री बंद करावी, अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून महिलांसह पुरुषही करत आहेत. मात्र, पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत दहा ते पंधरा महिला आणि पुरुषांनी रात्रभर गाव परिसरातील दारू अड्डे उद्ध्वस्त करत गावठी दारू व त्यासाठी वापरले जाणारे साहित्य घेऊन थेट पोलिस ठाण्यात धडक दिली, तर पोलिस ठाण्याच्या परिसरात जोरदार घोषणा दिल्या. गावात दारू पिऊन जो येईल त्याला चोप दिला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.