गुम्मी येथील महिलांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:30 AM2021-02-08T04:30:10+5:302021-02-08T04:30:10+5:30
धामणगाव धाड येथून जवळच असलेल्या गुम्मी येथील हातपंप गेल्या महिनाभरापासून बंद आहे. गावात पाण्याचा दुसरा स्रोत नसल्याने महिलांची थंडीत ...
धामणगाव धाड येथून जवळच असलेल्या गुम्मी येथील हातपंप गेल्या महिनाभरापासून बंद आहे. गावात पाण्याचा दुसरा स्रोत नसल्याने महिलांची थंडीत पाण्यासाठी भटकंती हाेत असल्याचे चित्र आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सचिव राजरतन जाधव व प्रशासक पुरुषोत्तम सोनुने व बीडीओ सावळे यांच्याकडे केली हाेती. १५ दिवसांचा कालावधी लाेटूनही ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. मध्यंतरी ग्रामंपचायतींच्या निवडणुका असल्याने ग्रामस्थांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. गावात पाण्याचा दुसरा कुठलाही स्रोत नसल्याने महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. सध्या शेती मशागतीची कामे सुरू आहेत. रब्बी हंगामातील हरभरा व तूर साेंगणीची कामे सुरू आहेत. अशा स्थितीत शेतमजुर महिलांना मजुरी साेडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने हातपंप सुरू करून गावातील नागरिकांसह महिलांची हाेणारी पायपीट थांबवावी, अशी मागणी गुम्मी येथील विजय हुंडीवाले, राजू आव्हाटे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
काेट
यासंदर्भात वरिष्ठांना पत्रव्यवहार केला आहे. पुढील कारवाई करण्याची जबाबदारी पं.स.ची आहे.
राजरतन जाधव, गुम्मी ग्रामसेवक
महिनाभरापासून हातपंप बंद असल्याने महिलांना पिण्याचे पाणी अर्धा कि.मी. अंतरावरून पाणी आणावे लागत आहे.
पूर्णाबाई नरोटे महिला गुम्मी
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. या बाबीकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल.
सावित्रीबाई नपटे, गुम्मी