दारूबंदी करण्यासाठी सरसावल्या महिला
By admin | Published: May 26, 2017 01:23 AM2017-05-26T01:23:41+5:302017-05-26T01:23:41+5:30
चिखली : तालुक्यातील खैरव गावात विकल्या जाणाऱ्या अवैध दारूमुळे महिलांच्या अस्मितेला धोका पोहोचतोय. शिवाय गावातील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : तालुक्यातील खैरव गावात विकल्या जाणाऱ्या अवैध दारूमुळे महिलांच्या अस्मितेला धोका पोहोचतोय. शिवाय गावातील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत तर तरूणांसह कोवळ्या वयातील मुलेदेखील दारूच्या आहारी जात असल्याने येथील महिलांनी एकत्र येत गावातील अवैध दारूविक्रीला लगाम लावावा व संपूर्ण दारूबंदी करावी, अशी मागणी केली.
तालुक्यातील खैरव येथे अवैध दारूविक्री होत असल्यामुळे काही महिलांचे पती व किशोरवयीन मुले व्यसनाधीन झाली आहेत. शिवाय दारू पिऊन महिलांना मारहाण करण्याच्या घटना तसेच कौटुंबिक अत्याचार वाढले असून, गावातील लग्नसमारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भांडण-तंटे वाढले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, गावातील दारूड्यांमुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांची अस्मिता धोक्यात आली आहे. दारूविक्रेत्यांवर कोणाचाही वचक नसल्यामुळे राजरोसपणे दारू विकली जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे, तसेच गावातील शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला असल्याने गावातील अवैध दारू विक्री तातडीने बंद करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा सुमारे ५० महिलांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन चिखली पोलीस स्टेशनसह, राज्य उत्पादन शुल्क तसेच आमदार राहुल बोंद्रे यांनादेखील देण्यात आले आहे.