दारुबंदीसाठी महिलांचा ‘एल्गार’
By Admin | Published: March 10, 2015 01:59 AM2015-03-10T01:59:50+5:302015-03-10T01:59:50+5:30
बुलडाणा येथे महिलांचे अभिनव आंदोलन; दारूच्या रिकाम्या बाटल्यांसह निषेध.
बुलडाणा : विदर्भाची पंढरी असलेल्या तसेच माजिजाऊंचे माहेरघर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात दारुबंदी करावी, या मागणीसाठी सोनाळा येथील अस्तित्व महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष प्रेमल ताताई वाघ सोनोने यांच्यासह असंख्य महिलांनी ९ मार्चच्या सकाळी ४ वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ह्यविना छत्र बैठो आंदोलनह्ण सुरू केले आहे. दरम्यान, प्रशासनाने ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
२६ लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात वर्षअखेरीस जवळपास दोन कोटींची दारु विकली जाते. म्हणजे सरासरी एक व्यक्ती अंदाजे एका वर्षाला १५ ते १८ हजार रुपये दारूवर खर्च करतो. या दारूमुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वास्तविक बुलडाणा जिल्हा हा राजमाता जिजाऊंचे माहेरघर असून, संतश्री गजानन महाराजांची ही पावन भूमी आहे; मात्र या संत नगरीतसुद्धा दारुचा महापूर वाहात आहे. या दारुमुळे महिलांवरील कौटुंबीक व लैंगिक अत्याचारात वाढ होत आहे. दारुमुळे वारंवार होणार्या कौटुंबिक कलहाचा परिणाम लहान मुलांच्या मनावर होत आहे. एकीकडे महिलांना सक्षम बनविण्यासाठी विकासाच्या योजना राबविल्या जातात तर दुसरीकडे दारुसारख्या समाज विघातक गोष्टीला कायद्याचे पाठबळ दिले जात आहे. दारूमुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होऊ नयेत, यासाठी जिल्ह्यात कायमस्वरुपी दारूबंदी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अस्तित्व महिला बहुउद्देशीय संस्था सोनाळाचे अध्यक्ष प्रेमलताताई वाघ सोनोने यांच्यासह असंख्य महिलांनी दिला आहे.