मलकापूर पांग्रा ग्रामपंचायत कार्यालयात महिलांचा घागर माेर्चा
By संदीप वानखेडे | Published: June 23, 2023 03:49 PM2023-06-23T15:49:55+5:302023-06-23T15:50:16+5:30
माेर्चात सहभागी चार ग्रामपंचायत सदस्यांनी दिले राजीनामे, १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा
संदीप वानखडे, मलकापूर पांग्रा (बुलढाणा): नळ याेजनेसाठी दाेन काेटी ९० लाख रुपये मंजूर हाेऊनही मलकापूर पांग्रा येथे १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा हाेत आहे. पाणीटंचाईने त्रस्त महिलांनी २३ जून राेजी ग्रामपंचायत कार्यालयात माेर्चा काढला. माेर्चात सहभागी झालेल्या चार ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.
गत चार महिन्यांपासून मलकापूर पांग्रा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आठ हजार लाेकसंख्या असलेल्या गावात १५ ते २० दिवस एकेका वाॅर्डात नळाच्या माध्यमातून पाणीपुरवठा हाेताे. दुसरीकडे काही भागात दरराेज पाणीपुरवठा हाेत आहे. पाणी द्या, नाही तर खुर्च्या खाली करा, अशा घाेषणा देत महिला व नागरिकांनी शुक्रवारी हंडा माेर्चा काढला. गावातील नळ याेजनेसाठी दाेन काेटी ९० लाख रुपये मिळाले आहेत, तरीही पिण्याच्या पाण्यासाठी मलकापूर पांग्रावासीयांना भटकंती करावी लागते. मुबलक पाणी असतानाही पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो़. महिलांनी पाणी मिळत नसल्याकारणाने ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला होता. शेख हनीफ शेख कादर बागवान यांच्या नेतृत्वात हा माेर्चा काढण्यात आला. पाण्यासाठी सरपंच, उपसरपंच उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला. या निवेदनावर जवळपास २०० ग्रामस्थांची स्वाक्षरी आहे. पाणीटंचाईवर उपाय याेजना न केल्यास तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
‘या’ ग्रामपंचायत सदस्यांनी दिले राजीनामे
गावातील पाणीटंचाई तीव्र झाल्याने तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून उपाय याेजना करण्यात येत नसल्याने ग्रामपंचायत सदस्य समीना बी़. शेख, निसार पटेल, किरण काकडे, राजू साळवे, साबीर खान पठाण आदींनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे राजीनामा दिला आहे. गावातील पाणीटंचाईचा प्रश्न पेटल्याचे चित्र आहे.