दारुबंदीसाठी महिलांची पोलीस स्टेशनवर धडक
By admin | Published: July 17, 2017 07:25 PM2017-07-17T19:25:47+5:302017-07-17T19:25:47+5:30
वाघोळा येथील मातृशक्तीने एल्गार पुकारीत नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळ यांच्या नेतृत्वात १७ जुलै रोजी दुपारी दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनवर धडक दि
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : गावातील अवैधरित्या सुरु असलेल्या दारु विक्री विरुध्द वाघोळा येथील मातृशक्तीने एल्गार पुकारीत नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळ यांच्या नेतृत्वात १७ जुलै रोजी दुपारी दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनवर धडक दिली. त्यामुळे पोलीसांना वाघोळा येथे जाऊन दारु विक्रेत्याविरुध्द कारवाई करणे भाग पडले.
दारुबंदीकरिता वाघोळा येथील मातृशक्तीने एकत्र येवून वाघोळा ते दसरखेड एमआयडीसी पो.स्टे.वर धडक दिली. या मोर्चात अॅड.रावळ, सरपंच बाळू पाटील, उपसरपंच नितीन पाचपोळ, तंटामुक्ती अध्यक्ष विजय पाचपोळ, गजानन ठोसर, सुनिल बगाडे आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते. दरम्यान दसरखेड एमआयडीसी पो.स्टे. आवारात ठिय्या देत महिलांनी दारु विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा तो पर्यंत परत घरी जाणार नाही ही आक्रमक भूमिका घेतल्याने चांगलीच खळबळ उडाली. यावेळी पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांनी महिलांची समजूत काढीत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व तात्काळ वाघोळा येथे पोलीस कर्मचाऱ्यांची चमू रवाना केली. पो.कॉ.संजय निंबोळकर, दिलीप रोकडे व आनंद माने यांच्या चमुने वाघोळा येथे जावून दिपक मोरे या दारु विक्रेत्यास २० देशी दारुंच्या बाटल्यांसह ताब्यात घेतले. तर पोपटराव मोरे यांच्या घरातून १२ देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
याबाबीची कुणकुण लागताच इतर तिघे दारु विक्रेते यांनी स्वत:च्या घराला कुलूप ठोकून पोबारा केला होता. दरम्यान सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास राष्ट्रवादीचे नेते संतोषराव रायपुरे यांनी भेट देत आपला पाठींबा दिला. आंदोलनात सुमनबाई कारंजकर, मिना मांडोकार, अनुसया मोरे, लताबाई बावीसआणे, तुळसाबाई तायडे, शांताबाई सोनोने, शिलाबाई बावीसआणे, यासह इतर महिला व ग्रामस्थ सहभागी झाले होते.