उभ्या पिकात विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:42 AM2021-09-10T04:42:01+5:302021-09-10T04:42:01+5:30
तालुक्यातील नारायणखेड-उंबरखेड विद्युत पुरवठा विभागाने या मार्गावर १३३ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. विद्युत वाहिनी ...
तालुक्यातील नारायणखेड-उंबरखेड विद्युत पुरवठा विभागाने या मार्गावर १३३ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. विद्युत वाहिनी टाकण्याचे काम खामगाव येथील कंपनीला देण्यात आलेले आहे. परंतु काम करताना कंपनीला शासनाने काही अटी आणि शर्तीचे पालन करावे, असे शासन आदेश आहेत. त्यामध्ये विद्युत खांबासाठी आरक्षित जागेमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणजे ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या शेतात पीक नाही त्यावेळेस करावे, असे शासनाच्या अध्यादेशामध्ये नमूद आहे. परंतु कंपनीने भरपावसाळ्यात विद्युत वाहिनीचे काम सुरू ठेवले आहे. त्यामध्ये आळंद येथील शेतकरी शंकर खार्डे, सुभाष खार्डे, प्रकाश खार्डे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचा शेतातील सोयाबीन पिकास अन्य पिकाचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भात शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे कंपनीने काम थांबवावे यासाठी विनंती केली, परंतु त्याचा उपयोग झाला नाही.
मोबदला मिळेपर्यंत काम होऊ न देण्याचा इशारा
विद्युत वाहिन्या टाकताना झालेल्या पीक नुकसानाची भरपाई जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत कंपनीचे कामकाज चालू देणार नाही, असा आंदोलनाचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनावर संतोष खार्डे, प्रल्हाद खार्डे, अशोकराव खार्डे, श्रीकांत खार्डे, भागोजी खार्डे, योगेश खार्डे, लक्ष्मण खार्डे, संजय खार्डे, विजय खार्डे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.