हिवरा आश्रम ते दुधा रस्त्याचे काम लवकरच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:38 AM2021-05-25T04:38:00+5:302021-05-25T04:38:00+5:30
हिवरा आश्रम येथून दुधा-ब्रह्मपुरी येथील श्री क्षेत्र ओलांडेश्वर संस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याला अनेक ठिकाणी वळणे ...
हिवरा आश्रम येथून दुधा-ब्रह्मपुरी येथील श्री क्षेत्र ओलांडेश्वर संस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याला अनेक ठिकाणी वळणे आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी या रस्त्यावर येत असल्यामुळे या रस्त्याला खड्डे पडल्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. दुधा-ब्रह्मपुरी येथील श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थानची ख्याती राज्यभर पसरली आहे. या संस्थावर महाशिवरात्रीच्या दिवशी नऊ दिवसांचा मोठा उत्सव भरत असतो. याशिवाय श्रावण महिना, अमावास्या, पौर्णिमा यासारख्या विविध दिवशी संस्थानावर भाविकांची प्रचंड गर्दी असते. मात्र, या संस्थावर जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यासाठी अनेक वेळा नागरिकांनी मागणी केली आहे. हिवरा आश्रम ते दुधा ही दोन पर्यटनस्थळे आहेत.
या दोन्ही पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे या रस्त्याचे काम त्वरित व्हावे यासाठी पालकमंत्री यांच्याकडे जिल्हा परिषदेचे सदस्य संजय वडतकर यांनी मागणी केली आहे. पालकमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी तात्काळ खास बाब म्हणून पर्यटन निधीतून रस्त्याकरिता निधी उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले आहे.
भाविकांना मिळणार दिलासा
हिवरा आश्रम ते ओलांडेश्वर संस्थान हे दोन्ही पर्यटनस्थळे असल्याने पर्यटक निधीमधून निधी उपलब्ध झाल्यास या रस्त्याचे काम लवकरच पूर्णत्वास येणार आहे. हे दोन्ही रस्ते जोडले गेल्यास या ठिकाणी भाविकांसह पर्यटकांची गर्दी राहणार आहेत.