मापारी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून काढून घेतली कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:36 AM2021-05-09T04:36:17+5:302021-05-09T04:36:17+5:30
मेहकर : रस्त्याच्या कामात प्रचंड दिरंगाई केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने संभाजीनगर येथील मापारी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून ३ कामे काढून घेतली ...
मेहकर : रस्त्याच्या कामात प्रचंड दिरंगाई केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने संभाजीनगर येथील मापारी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून ३ कामे काढून घेतली आहेत.
मेहकर ते अंत्री देशमुख या साडेसात कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या पूर्णत्वाची मुदत ७ डिसेंबर २०१९ होती. मात्र, काम झाले नसल्याने पुन्हा ३ महिने मुदत वाढवून घेतली. तरीही काम अपूर्ण राहिले. पुन्हा मुदतवाढीसाठी कंपनीने मुंबई येथील मुख्य अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयाकडे अर्ज करून कासव गतीने काम सुरू आहे. याच रस्त्यावर शहरात ५७५ मीटर सिमेंट रस्ता तयार करण्याचे कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभागाने याच कंपनीला दिले होते. मात्र, रस्ता खोदून कंपनी काम जलद गतीने न करता अतिशय धीम्या गतीने करताना दिसत होती. विशेष म्हणजे हा रस्ता ग्रामीण रुग्णालय, आ. संजय रायमूलकर यांचे निवासस्थान, बायपासला जोडणारा असल्याने सतत वाहतूक सुरू असते. कंत्राटदाराच्या जाणीवपूर्वक दिरंगाईमुळे जनता संतप्त होऊन आ. संजय रायमूलकर यांच्याकडे रोष व्यक्त करीत होती व त्यांच्याबद्दलसुद्धा नाराजी व्यक्त करीत होती. अशीच परिस्थिती संबंधित बांधकाम कंपनीने घेतलेल्या मतदारसंघातील दोन कामांच्या बाबतीतही दिसून आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने मेहकर ते अंत्री देशमुख रस्त्यावरील ५७५ मीटर सिमेंट रस्ता, लोणार तालुक्यातील एक रस्ता व अमडापूर-जानेफळ-लोणीगवळी रस्ता, अशा तीन रस्त्यांच्या कामाचे कंत्राट सदर कंपनीकडून काढून घेतले आहे. तसे कंपनीने लिहून दिल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता नव्याने टेंडर निघून कंत्राट दिले जाईल, तर मेहकर ते अंत्री देशमुख हा उर्वरित रस्ता मात्र मापारी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करीत असल्याने ते काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी हाेत आहे.