World Blood Donor Day : कोरोना काळात दहा हजार जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 11:43 AM2021-06-14T11:43:47+5:302021-06-14T11:43:58+5:30
World Blood Donor Day: कोरोना संसर्गाच्या काळात बुलडाणा जिल्ह्यात जवळपास दहा हजार नागरिकांनी रक्तदान केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या काळात बुलडाणा जिल्ह्यात जवळपास दहा हजार नागरिकांनी रक्तदान केले आहे. १४ जूनच्या रक्तदाता दिनानिमित्ताने माहिती घेतली असता ही बाब समोर आली.
गेल्या वर्षभरात शासकीय रक्तपेढ्यांद्वारे जवळपास १४० रक्तदान शिबीरेही झाली. जिल्ह्यात बुलडाणा, खामगाव आणि शेगाव येथे शासकीय रक्तपेढी असून खामगाव, आणि बुलडाणा येथे तीन खासगी रक्तपेढ्या आहेत. या सर्व रक्तपेढ्यांची जवळपास एक हजारपेक्षा अधिक रक्तपिशव्या साठवण्याची क्षमता आहे. २०२१ मधील साडेपाच महिन्यात शासकीय रक्तपेढीद्वारे आतापर्यंत १८०० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. थोडक्यात १८०० जणांनी रक्तदान केले आहे तर आतापर्यंत २५ रक्तदान शिबीरेही घेण्यात आली असल्याची माहिती रक्तपेढीतील वैज्ञानिक अधिकारी संजय सपकाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आपत्कालीन स्थितीसाठी साठवण केंद्र
आपत्कालीन परिस्थितीत जिल्ह्यात वेळेत रक्त रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी मलकापूर, चिखली, मेहकर, देऊळगाव मही आणि सि. राजा येथे रक्तसाठवण केंद्र उभारण्यात आले आहे. येथून अल्पावधीत जिल्ह्यात त्वरित रक्त पोहोचविता येते, असे रक्तपेढीतील वैज्ञानिक अधिकारी संजय सपकाळ यांनी स्पष्ट केले.
आज रक्तदान शिबीर
रक्तदाता दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्येही एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रक्तदात्यांनी येथे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांसह रक्तसंक्रमण अधिकारी यांनी केले आहे.