लेखकाने आपल्या शब्दांवर विश्वास ठेवावा - विश्वास पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 06:58 PM2021-01-25T18:58:18+5:302021-01-25T19:03:16+5:30
Vishwas Patil: विश्वास पाटील यांनी दिला नवोदित लेखकांना सल्ला.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : लेखक व साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर डोळा न ठेवता आपल्या शब्दांवर विश्वास ठेवून लिखाण करावे, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी नवोदित लेखकांना दिला. बुलडाणा येथे राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील होते. यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला.
प्रश्न : आपण छत्रपती संभाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर लिखाण केले. हेच नायक तुम्ही का निवडले?
उत्तर : मी आतापर्यंत पाणीपत, झाडाझडती, पांगीरा, गाभूळ यासह आखणी पुस्तकांचे लिखाण केले आहे. यामध्ये प्रेमकथा आहेत तसेच सामाजिक आशयसुद्धा आहे. त्यामुळे उपेक्षित नायकांवरच लिखाण केले, असे नाही.
प्रश्न : नोकरी सांभाळीत ऐवढे दर्जेदार साहित्य निर्मिती करताना काही अडचणी आल्या काय?
उत्तर : अनेक अडचणी आल्यात. मी केवळ साडेपाच तास झोपतो. पहाटे वेळ मिळतो, त्यावेळी लिहितो. शनिवारी व रविवारी संपूर्ण वेळ लिखाण करतो.
प्रश्न : आगामी पुस्तक कोणते येणार आहे?
उत्तर : गाभूळलेल्या चंद्रबनात हे पुस्तक येत आहे.
प्रश्न : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपण होऊ शकआ नाहीत, याची खंत वाटते काय?
उत्तर : मला पुणे येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. मीच नकार दिला. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तर एक वर्ष त्यात गुंतून राहावे लागते. वर्षभर सत्कार व अन्य कार्यक्रम चालतात. त्याऐवजी मी नवीन लिखाण करण्याला प्राधान्य दिले.
प्रश्न : सोशल मीडियावर अनेक नवोदित कवी व लेखक निर्माण होतात व लगेच संपून जातात?
उत्तर : नवोदित व सोशल मीडियावर लिखाण करणाऱ्यांना घाई फार असते. ते लिखाण करतील व जेव्हा त्यांनाच कंटाळा येईल, तेव्हा ते बंद करतील.
प्रश्न : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबद्दल बरेच गूढ समाजात आहे. याबद्दल काय सांगाल?
उत्तर : आतापर्यंत संपूर्ण देशात ५२ साधू व संन्याशांनी तेच सुभाषचंद्र बोस असल्याचे सांगत सांगितले. नेताजींचा मृत्यू कसा झाला हे विसरा व त्यांचे विचार आत्मसात करायला हवे. मी याचा शोध घेण्याकरिता जपानमध्ये गेलो होतो. त्यावेळी नेताजींसोबत विमानात असलेल्यांच्या नातेवाईकांनाही मी भेटलो आहे.
प्रश्न : पाणीपत कादंबरी कशी साकारली, याबाबत काय सांगाल?
उत्तर : मी पाणीपतला गेलो होतो. त्यावेळी तेथे कुणीही जात नव्हते. उसाच्या शेतात त्या जागेचा शोध घेतला. तेथे केवळ एक चौथरा होता. ती कादंबरी आल्यानंतर पाणीपतला लाखो लोक जायला लागले. त्या जागेला आता मोठे वैभव प्राप्त झाले आहे. एका साहित्यिकासाठी ही सन्मानाची बाब आहे. यापेक्षा जास्त काय हवे.
प्रश्न : नवोदित लेखकांना काय संदेश द्याल?
उत्तर : यशाची घाई न करता तपश्चर्या, आराधना करायला हवी. मेहनत घेतली, श्रम केले तर काहीच अवघड नाही. ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले अजूनही रियाज करतात. मी वयाच्या २८व्या वर्षी पाणीपत लिहिली होती. त्यापूर्वीही मी अडीच हजार पाने लिहिली होती. लेखकांनी इतरांच्या आयुष्यात डोकावून बघायला हवे. त्यांच्या अनुभवातून शिकायला हवे. केवळ साहित्य संमेलनावर डोळा न ठेवता आपल्या शब्दांवर विश्वास ठेवायला हवा.