साहित्यिकांनी समाज परिवर्तनासाठी लेखणी झिजवावी- पुरुषोत्तम खेडेकर

By निलेश जोशी | Published: December 24, 2023 08:15 PM2023-12-24T20:15:04+5:302023-12-24T20:15:17+5:30

चौदाव्या जिल्हा साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

Writers should use their pen for social change - Purushottam Khedekar | साहित्यिकांनी समाज परिवर्तनासाठी लेखणी झिजवावी- पुरुषोत्तम खेडेकर

साहित्यिकांनी समाज परिवर्तनासाठी लेखणी झिजवावी- पुरुषोत्तम खेडेकर

बुलढाणा : धर्माची दारू व जातीची नशा, परधर्माचा टोकाचा द्वेष आपल्या उंबरठ्याजवळ आलाय. अशा वेळी साहित्यिकांनी समाज परिवर्तनासाठी आपली लेखणी झिजवावी, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा चौदाव्या जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी रविवारी येथे केले.

स्थानिक जिजामाता महाविद्यालयातील ताराबाई शिंदे साहित्य नगरीत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान प्रारंभी संमेलनाचे उद्घाटन अभिनेत्री मुक्ता कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वागताध्यक्ष प्रशांत कोठे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, प्राचार्य गोविंद गायकी, माजी संमेलनाध्यक्ष रवींद्र इंगळे चावरेकर, बारोमासकर डॉ. सदानंद देशमुख, मंत्रालयीन उपसचिव सिद्धार्थ खरात, पत्रकार प्रशांत घुले, प्रा. विष्णुपंत पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते.

ॲड. पुरुषोत्तम खेडेकर पुढे म्हणाले की, जग बदलायचे तेव्हा बदलेल, बदलाची सुरुवात सर्वप्रथम कुटुंबाला विश्वासात घेऊन करा. आजही आम्ही बहुसंख्येने असलो तरी विषमतावादी, शोषणवादी व वर्ण वर्चस्ववादी वैदिक साहित्याचे हमाल म्हणूनच ओझे वाहत आहोत. तुकोबांनी शब्दची आमच्या जिवाचे जीवन, शब्दावाटू धन जनलोका!, असे सांगितले आहे. मित्रांनो, शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही शिक्षित झालो.

रोजगार मिळाला, चरितार्थ चालवायला सक्षम झालो. आता शब्दरूपी धनाची आम्ही बाजारात विक्री करीत आहोत. शिक्षणाचा आर्थिकदृष्ट्या उपयोग झालाच पाहिजे. परंतु हजारो वर्षे आमच्यावर होत असलेला अन्याय अत्याचाराविरोधात लढण्यात अपेक्षित यश आजही मिळाले नाही. उच्च शिक्षित व शहाणे लोकांनी बहुजन विचारांचे काम केले नाही तरी चालेल. पण ब्राह्मणी विचारांची पालखी आपल्या खांद्यावर वाहने समाजद्रोह आहे. असे सांगून त्यांनी धर्म, वैदिक साहित्य, शेती व्यवस्था यावर प्रभावी भाष्य केले.

डॉ. प्रशांत कोठे यांनी संमेलनाची भूमिका मांडली. प्राचार्य गोविंद गायकी, सदानंद देशमुख, सिद्धार्थ खरात, प्रकाश पोहरे, सदाभाऊ खोत यांनी विचार मांडले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होतोय - मुक्ता कदम
लोक बोलायला घाबरत आहे. ही लोकशाही धोक्यात आल्याचे प्रतीक आहे. अभिव्यक्तीचा संकोच करणारे कायदे आणले जात आहे. मणिपूर घटना आपण कशी विसरू शकतो? कुस्तीपटू साक्षी मलिकचे दुःख कोणालाही स्पर्श करून गेले नाही यावरून आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. अशावेळी साहित्यिकांनी विवेकाचा आवाज बनावे, असे संमेलनाच्या उद्घाटक अभिनेत्री मुक्ता कदम म्हणाल्या.

सदाभाऊ खोत व प्रकाश पोहरे यांना पुरस्कार
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या बळीचा आक्रोश या पुस्तकास व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भाऊ पोहरे यांना यावेळी बारोमास कृषी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संमेलनाध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दृकश्राव्य माध्यमात वृत्तनिवेदक म्हणून काम करणारे प्रशांत घुले पाटील यांना जिल्हा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: Writers should use their pen for social change - Purushottam Khedekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.