वाडी खुर्द येथील रेशन दुकानावर धाड
By admin | Published: April 2, 2017 01:41 AM2017-04-02T01:41:47+5:302017-04-02T01:41:47+5:30
१ लाख ६१ हजार २३0 रुपयांचा माल जप्त केला.
जळगाव जामोद, दि. १- येथील वाडी खुर्द भागातील स्वस्त धान्य दुकानावर ३१ मार्चचे रात्री स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणाच्या पथकाने धाड टाकून ८ हजार निळ्या रॉकेलसह १ लाख ६१ हजार २३0 रुपयांचा माल जप्त केला. व दुकान मालक सुनीता गजानन वघ रा. माळीखेळ जळगाव यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरुन पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर तथा अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणाचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, सहायक पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर, पोलीस उपनिरीक्षक सैयद मोहसीन, दिनकर गोरे, बबन रायपुरे, पोहेकॉ ठाकूर, सैयद हारुण, अताउल्ला खान, अविनाश जाधव, गजानन आहेर, विलास साखरे, रामेश्वर मुंढे, दीपक पवार, महिला पो.कॉ. सरिता वाकोडे या पथकाने ३१ मार्चला रात्री १0.३0 वाजता सदर दुकानावर धाड टाकली व दुकानच्या शटरला असलेले कुलूप तोडून १ एप्रिलच्या सकाळी ३ वाजेपर्यंत कारवाई केली.
यावेळी ४0 बॅरल रॉकेल, दोन कॅन, दोन पांढर्या कॅन, चाळी, अर्धा एच.पी. इलेक्ट्रिक मोटार, असा एकूण १ लाख ६१ हजार २३0 रुपयांचा माल जप्त केला. यावेळी नायब तहसीलदार सोले यांची उपस्थिती होती.
जळगाव जामोद ते नांदुरा रोडवरील गोरक्षण वाडी भागातील स्वस्त धान्य दुकानात व आजूबाजूचे दुकानात निळ्या रंगाचे रॉकेल काळ बाजारात विक्रीकरिता साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन ही कारवाई करण्यात आली.