गावठी दारू अड्यांवर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हे
By admin | Published: October 23, 2016 01:56 AM2016-10-23T01:56:05+5:302016-10-23T01:56:05+5:30
बुलडाणा शहर पोलिसांची कारवाई; १६ हातभट्या केल्या उद्ध्वस्त.
बुलडाणा : शहरातील अवैधरीत्या चालणार्या देशी व गावठी दारू अड्डय़ावर शहर पोलिसांनी २२ ऑक्टोबर रोजी धाडी टाकून १६ हातभट्टय़ा उद्ध्वस्त केल्या. यामध्ये ६१ हजार रुपयांचा माल जप्त करून, १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
दारूच्या अड्डय़ावर धाड टाकण्याची कारवाई शहरातील भिलवाडा व मिलिंदनगर परिसरात करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे देशीसह गावठी दारूची विक्री करणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपासून नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. निवडणुकीदरम्यान शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांच्या आदेशान्वये शहरात अवैध व्यवसायाविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, आज ठाणेदार अंबादास हिवाळे यांच्यासह त्यांच्या पथकाच्या कर्मचार्यांनी शहरातील भिलवाडा व मिलिंदनगर परिसरात धाडी टाकून ६१ हजार रुपयांचा माल जप्त करून संदीप काकडे, चंद्रकांत नरवाडे, नीलेश बोरकर, मंगला गायकवाड, विमल किशोर, बाळकृष्ण निकम, अशोक हिवाळे, गोपाल ठाकूर, शशीकला सोळंके, राधा गायकवाड, ताराबाई बरडे, सुशीला गायकवाड व रंजना मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तसेच १६ हातभट्टय़ा उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक ठाकूर, पाटील, पोलीस उपनिरीक्षक हिवराळे, पोहेकॉ दाभाडे, लक्ष्मण जाधव, राजू चौधरी, घुगे, निकम, लेकुरवाळे यांनी केली आहे. बुलडाणा शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी अवैध दारू विक्री होत असून, याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.