यंदा खरिपाच्या लागवड क्षेत्रात ३१६ हेक्टरने होणार वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:36 AM2021-05-07T04:36:27+5:302021-05-07T04:36:27+5:30

सुधीर चेके पाटील चिखली : सध्या सर्वत्र कोरोनाची आपत्ती असली तरी या आपत्ती काळातही खरिपाचा हंगाम यशस्वी व्हावा, यासाठी ...

This year kharif cultivation area will increase by 316 hectares! | यंदा खरिपाच्या लागवड क्षेत्रात ३१६ हेक्टरने होणार वाढ !

यंदा खरिपाच्या लागवड क्षेत्रात ३१६ हेक्टरने होणार वाढ !

Next

सुधीर चेके पाटील

चिखली : सध्या सर्वत्र कोरोनाची आपत्ती असली तरी या आपत्ती काळातही खरिपाचा हंगाम यशस्वी व्हावा, यासाठी कृषी विभाग पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. विभागाने यंदा तालुक्यातील ८८ हजार ६१० हेक्टर कृषी क्षेत्रावर खरिपाचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक पेरा सोयाबीनचा गृहीत धरण्यात आला आहे. दरम्यान, गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झालेले असल्याने यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याने ३१६ हेक्टरवर क्षेत्राचे अतिरिक्त नियोजन देखील करण्यात आले आहे.

तालुक्यात सुमारे ९० हजार हेक्टर लागवडीलायक क्षेत्र आहे. यापैकी सरासरी पेरणी क्षेत्र हे ८८ हजार ४२३ आहे. गतवर्षी ८८ हजार २९४ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला होता. दरम्यान, गतवर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यातही जलाशयांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहेत. या पृष्ठभूमीवर यंदा पावसाने तालुक्याची सरासरी गाठली तरी पाण्याची कमतरता जाणवणारी नसल्याने यंदाच्या हंगामात खरिपाच्या पेऱ्यात वाढ होण्याची शक्यता पाहता कृषी विभागाने यंदा ८८ हजार ६१० हेक्टरावर पेरणीचे नियोजन केले आहे. प्रामुख्याने तालुक्यातील शेतकरी सोयाबीन या नगदी पिकालाच सर्वाधिक प्राधान्य देत असल्याने यंदाही एकूण लागवडी क्षेत्रापैकी तब्बल ६८ हजार ३८० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ११ हजार ५०० हेक्टरवर तूर, ३ हजार ८०० हेक्टरवर उडीद, २ हजार ४०० हेक्टर मूग या प्रमुख पिकांना प्राधान्य राहणार असल्याचे संकेत या नियोजनातून मिळत आहेत.

मका पिकाकडे पाठ !

खरिपातील मका पिकास मिळणारा अत्यल्प भाव व नुकसान यामुळे गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यातील मका पिकाच्या क्षेत्रात कमालीची घट दिसून येत आहे. सन २०१८ मध्ये १ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर असलेल्या मक्याची २०१९ मध्ये केवळ २५० हेक्टरपर्यंत लागवड झाली होती, तर २०२० मध्ये २१० हेक्टर याप्रमाणे सातत्याने मक्याचे क्षेत्र घटत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागानेही यंदा देखील केवळ २५० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाचे नियोजन केले आहे.

इतर पिकांचे नियोजन

सोयाबीनचे प्रमुख पीक वगळता संकरित ज्वारी ८० हेक्टर, बाजरी ५, भुईमुगाची ५० हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे, तर सूर्यफूल, तीळ, आदी तेलबियांच्या क्षेत्रात कमालीची घट झालेली असल्याने केवळ ५ हेक्टर इतर तेलबियांचे नियोजन करण्यात आले आहे. इतर कडधान्याचे क्षेत्र १०० हेक्टरपर्यंत राहणार आहे.

घरच्या बियाण्यांचा होणार वापर !

गतवर्षी लॉकडाऊनमुळे ऐनवेळी बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर यंदा शेतकऱ्यांनी प्रामुख्याने सोयाबीन या प्रमुख पिकासाठी घरीच बियाणे काढून ठेवल्याचे दिसत आहे. संभाव्य पीक पेऱ्यानुसार बियाण्यांची आवश्यक पाहता सुमारे ६८ हजार ३५६ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज भासणार आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार सद्य:स्थितीत ६९ हजार १५९ क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध असल्याने यंदा बियाण्यांची कमतरता भासणार नाही.

Web Title: This year kharif cultivation area will increase by 316 hectares!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.