बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रेत यंदा मनोरंजनावर बंदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:12 AM2018-02-07T01:12:27+5:302018-02-07T01:12:36+5:30
बुलडाणा : हिंदू-मुस्लींच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी येथील हाजी हजरत अब्दुल रहेमान ऊर्फ सैलानी बाबा यांच्या यावर्षीच्या यात्रा महोत्सवात मनोरंजनावरच बंधणे घालण्यात आली आहेत. यात्रेदरम्यान फिरते चित्रपटगृह आणि मनोरंजनासाठी असलेले रहाट पाळणे व तत्सम साधनावरच बंदी घालण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : हिंदू-मुस्लींच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी येथील हाजी हजरत अब्दुल रहेमान ऊर्फ सैलानी बाबा यांच्या यावर्षीच्या यात्रा महोत्सवात मनोरंजनावरच बंधणे घालण्यात आली आहेत. यात्रेदरम्यान फिरते चित्रपटगृह आणि मनोरंजनासाठी असलेले रहाट पाळणे व तत्सम साधनावरच बंदी घालण्यात आली आहे. यात्रेदरम्यान परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता जिल्हा न्यायदंडाधिकारी या नात्याने हा निर्णय घेतला आहे.
अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या या यात्रेच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी दुबे, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा, निवासी उपजिल्हाधिकारी ललित वर्हाडे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी, रायपूरचे ठाणेदार जलालउद्दीन सय्यद यांच्यासह पंचायत समिती सदस्य शेख चाँद मुजावर, शेख हाशम मुजावर सैलानी ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल समद प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, यात्रेच्या ठिकाणी येणार्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, पार्किंग व्यवस्था निट व्हावी, याबाबत सूचना दिल्या.
व्यावसायिकांचे आधार आणि मोबाइल क्रमांक घेणार
यात्रेमध्ये दुकाने थाटणार्या व्यावसायिकांचे आधारकार्ड आणि मोबाइल क्रमांकही यंत्रणेने घ्यावेत, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. सोबतच यात्रा परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून लाईटिंग आणि वॉच टॉवर लावण्याबाबतही जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यंत्रणेला बजावले आहे.