होय ! मुलांचे बालपण हरवत आहे
By admin | Published: November 13, 2014 11:53 PM2014-11-13T23:53:07+5:302014-11-13T23:53:07+5:30
लोकमत परिचर्चेतील सूर, बालपण फुलेल, असे वातावरण निर्माण करण्याची गरज अधोरेखीत.
बुलडाणा : मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य देतानाच त्यांच्या भविष्याला आकार देण्याचे संस्कार हे आपसुक झाले पाहिजेत, असे वातावरण निर्माण करणे म्हणजे मुलांचे भावविश्व जोपासणे, त्यांचे बालपण सांभाळणे. बदलत्या काळात मात्र अपेक्षांच्या वाढत्या ओझ्याखाली आजची बालपिढी पुर्णत: दबलेली आहे. कदाचित या पिढीच्या बालपणाची व्याख्या आता तशीच करावी लागेल, अशी खंत व्यक्त करीत मुलांचे बालपण हरवित असल्याचे मत लोकम तच्या परिचर्चेत व्यक्त करण्यात आले. परिचर्चेत ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार, प्राचार्य शाहीना पठाण, डॉ. स्वाती लढ्ढा यांच्यासहभागासह बुलडाणा जिल्ह्यातील बालसाहित्यिक शंकरराव क-हाडे, गो. यो. सावजी व सुभाष किन्होळकर यांनी सहभाग घेतला. घराघरात असलेली ज्येष्ठांची संस्कार शाळा कमी होण्यापासून तर टीव्ही, इंटरनेट, व्हिडिओ गेम्सच्या अती वापराबद्दलही या परिचचेत इशारा देण्यात आला. मोबाईलमध्ये इंटरनेटची असलेली सहज उपलब्धता ही मनोरंजन म्हणून वा परण्याऐवजी तिचा ज्ञान व माहिती मिळविण्याच्या दृष्टीनेही वापर होतो, हे बालकांना शिकविता आले पाहिजे. मुळातच त्यांच्यातील बालपण फुलेल, ते अभिव्यक्त होईल, असे वातावरण घरात निर्माण करा, हे सर्वांनीच आवर्जून सांगितले.