होय, याला जबाबदार आपणच ! गायीच्या पोटातून काढले ४० किलो प्लास्टिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 09:10 IST2025-02-18T09:10:12+5:302025-02-18T09:10:36+5:30

पोटात  प्लास्टीक अडकल्याचे आढळले. ती ‘रुमिनल टिम्पनी’ या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले.

Yes we are responsible for this 40 kg of plastic removed from cow's stomach | होय, याला जबाबदार आपणच ! गायीच्या पोटातून काढले ४० किलो प्लास्टिक

होय, याला जबाबदार आपणच ! गायीच्या पोटातून काढले ४० किलो प्लास्टिक

मलकापूर (जि. बुलढाणा) : शहरातील एक गाय पोट फुगल्याने विव्हळत होती. मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या या गायीला वाचविण्यासाठी शस्त्रक्रिया करून तब्बल ४० किलो प्लास्टीक काढण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन भोळे आणि डॉ. चेतन शेंबेकर यांनी शस्त्रक्रियेतून गायीला वाचविले.

रस्त्यावर पडलेली ही गाय  विव्हळत असल्याने प्रा. कृष्णा मेसरे यांनी तत्काळ डॉक्टरांना माहिती दिली. डॉक्टरांनी घटनास्थळी दाखल होत गायीच्या पोटात साचलेल्या वायूमुळे तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे निदर्शनास आणले. पोटात  प्लास्टीक अडकल्याचे आढळले. ती ‘रुमिनल टिम्पनी’ या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले.

या बाबी टाळाव्या

हॉटेलचा कचरा, बाजाराचा टाकून दिलेला भाजीपाला, शिल्लक अन्न, फळांची साले आदी बाबी  प्लास्टीक पिशव्यांमध्ये बांधून पिशव्या कचऱ्यात टाकल्या जात असल्याने हे प्लास्टीक जनावरांच्या खाण्यात येते. त्यामुळे  प्लास्टीकचा वापर बंद करण्याचे आवाहन पशूप्रेमींकडून करण्यात येते.

रुमिनल टिम्पनी म्हणजे ?

सोप्या भाषेत याला ढेकर अडकणे किंवा पचनसंस्थेतील वायू अडकणे म्हणतात.

ही समस्या प्रामुख्याने गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांसारख्या जनावरांमध्ये  दिसून येत असल्याचे डॉक्टर सांगतात.

याची विविध कारणे असून, प्लास्टीक खाण्यात येणे हे एक कारण आहे.

तीन तास शस्त्रक्रीया

गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडून असलेल्या गायीची प्रकृती पाहता डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. घटनास्थळी दाखल होत तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर गायीच्या पोटातून  प्लास्टीक बाहेर काढण्यात आले.  

यापूर्वी काढले चक्क ८० किलो प्लास्टीक

२०२१ च्या जून महिन्यात चंद्रपूर शहरात एका गर्भवती मृत गायीच्या पोटातून तब्बल ७२ किलो प्लास्टीकचा कचरा काढण्यात आला होता. अशा घटना वारंवार घडत आहेत.

२०२१ च्या मे महिन्यात नागपूर शहरातही एका गायीच्या पोटातून तब्ब्ल ८० किलो  प्लास्टीक डॉक्टरांनी काढले होते. शस्त्रक्रियेनंतर या गायीचा जीव वाचला होता.

पोटात साचून राहिल्याने कोणता अडथळा?

 प्लास्टीक पिशव्या, रबर, दोर चघळून गिळल्याने जनावरांच्या अन्ननलिकेत अडथळा निर्माण होतो. यामुळे मृत्यूही ओढावतो.

या पदार्थांचे विघटन होत नसल्याने ते अन्ननलिकेत अडकून राहतात. पचन न होता पोटात तसेच साचून राहतात.

अन्ननलिकेत तयार झालेल्या अडथळ्यामुळे  ढेकर येणे बंद होते. याचा परिणाम वायू आत अडकून राहतो.

गायींसंदर्भात हे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने  प्लास्टीक वापरावर निर्बंध आणण्याची मागणी होत आहे.

Web Title: Yes we are responsible for this 40 kg of plastic removed from cow's stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.