सोयाबीनचे एकरी उत्पन्न १५ हजाराच्या खालीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 05:46 PM2018-10-29T17:46:52+5:302018-10-29T17:47:06+5:30
बुलडाणा: जिल्ह्यात सोयाबीनचे एकरी उत्पादन जेमतेच पाच क्विंटलपर्यंत होत आहे. त्यात भावही अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत मिळत असल्याने एकरी सोयाबीनचे उत्पन्न १५ हजार रुपयांच्या खालीच राहत आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: जिल्ह्यात सोयाबीनचे एकरी उत्पादन जेमतेच पाच क्विंटलपर्यंत होत आहे. त्यात भावही अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत मिळत असल्याने एकरी सोयाबीनचे उत्पन्न १५ हजार रुपयांच्या खालीच राहत आहे. उत्पादनात घट त्यातही योग्य भाव नसल्याने जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. जिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख व नगदी पीक आहे. कपाशीवर पडणाºया गुलाबी बोंडअळीच्या भितीने यावर्षी सर्वाधिक क्षेत्र हेसोयाबीनचे राहिले आहे. खरीप हंगामाच्या एकूण साडेसात लाख हेक्टर क्षेत्रापैकी साडे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर यावर्षी सोयाबीनचा पेरा असून सध्या सोयाबीनचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. बहुतांश शेतातील सोयाबीन सोंगणीचे काम आटोपले आहे. त्यामुळे शेतात सोयाबीनच्या सुड्या काढण्याचीच लागबग पाहावयास मिळत आहे. तर निम्म्यापेक्षा जास्त शेतकºयांच्या सोयाबीनचा माल घरी आला आहे. परंतू जिल्ह्यात जेमतेम पाच क्विंटलपर्यंत एकरी सोयाबीन झाल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. काहींची सोयाबीन तर हिरवी असतानाच वाळून गेली. त्यामुळे अशा शेतकºयांना सोयाबीन सोंगणीची गरजच पडली नाही. परंतू सुरूवातीला झालेल्या थोड्याशा पावसावर आणि ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, अशा शेतकºयांना सोयाबीनचे उत्पादन घेता आले. त्यातही एक एकर शेतीमध्ये केवळ पाच क्विंटलपर्यंतच सोयाबीन होत आहे. काहींना तर एका एकरामध्ये एक ते दोन क्विंटलच माल झाल्याचे दिसून आले. त्यानंतर व्यापाºयांकडून सोयाबीनला २ हजार ५०० ते २ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव मिळतो. परंतू सोयाबीन जर दर्जेदार असेल, तर चाळणी केल्यानंतर तीन हजार रुपयांपर्यत भाव दिला जातो. परिणामस्वरूप, एका एकरामध्ये जास्तीत जास्त १५ हजार रुपयांपर्यतच शेतकºयांना उत्पन्न होत आहे. उत्पन्नातील घट, व्यापाºयांकडून मिळणारा अत्यल्प भाव, शेतीसाठी वाढलेला खर्च यासर्व बाबींमुळे सोयाबीन उत्पादक हवालदिल झाले आहेत.
शेतकºयांची दिवाळी आर्थिक टंचाईत
सर्व सणांमध्ये महत्वाचा समजल्या जाणाºया दिवाळी सणातच शेतकºयांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी दिवाळीपर्यंत सोयाबीनचे उत्पादन घरात येते. त्यानंतर सोयाबीन विक्री करून शेतकरी दिवाळी सण आनंदात साजरा करतात. मात्र यावर्षी सोयाबीनचे उत्पादन कमी होऊन त्याला भावही योग्य प्रमाणे मिळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे काही शेतकºयांनी हमीभावाच्या प्रतीक्षेत आपली सोयाबीन घरातच ठेवली आहे.
सोयाबीन शेती तोट्यात
शेतकºयांचा वर्षभराचा खर्च सोयाबीन या पिकाच्या भरवश्यावर आहे. परंतू सध्या सोयाबीनचे भाव अत्यल्प असल्याने सोयाबीन शेती तोट्यात सापडली आहे. सोयाबीनला सुरूवातीपासून नांगरणी, वखरणी, पेरणी, खत, बियाणे, दोन ते तीन वेळा फवारणी, दोन वेळा डवरण पाळी, सोयाबीनची सोंगणी, काढणी, वाहतूक खर्च यासर्व बाबींचा विचार केला तर एकरी खर्च १५ हजार रुपयांपेक्षा जास्त होत आहे. त्यात यावर्षीचे उत्पन्नच १५ हजार रुपयांच्या आसपास आल्याने अनेक शेतकºयांना आर्थिक फटका बसत आहे.