योग, प्राणायाम जीवनशैली बनली पाहिजे - शेखर पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 04:23 PM2020-05-16T16:23:37+5:302020-05-16T16:23:56+5:30
योगा, प्राणायम करणे गरजेचे असून ही जीवनशैली बनली पाहिजे, असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नोडल अधिकारी शेखर पाटील यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केले.
- सोहम घाडगे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन, जर्मनी, स्पेनसारख्या विकसित देशात बाधितांचा व मृत्यू पावणाºयांचा आकडा दिवसागणिक वाढतोय. या महामारीचा सामना करण्यासाठी सर्व जग एकत्रित प्रयत्न करीत आहे. मात्र अद्याप यावर प्रभावी लस शोधण्यात यश मिळालेले नाही. खबरदारी,शारीरिक तंदुरुस्ती व नियमांचे काटेकोर पालन करणे हाच सर्वात मोठा उपाय आपल्याकडे आहे. शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी योगा, प्राणायम करणे गरजेचे असून ही जीवनशैली बनली पाहिजे, असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नोडल अधिकारी शेखर पाटील यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केले.
जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात सध्या कोणती कामे सुरु आहेत?
दहावी आणि बारावीतील खेळाडू विद्यार्थ्यांना शासनाकडून प्रोत्साहनपर २५ गुण दिले जातात. क्रीडा विभागाकडे जवळपास १ हजार प्रस्ताव आले आहेत. अधिकारी, कर्मचारी त्याबाबत छाननी करीत आहेत. छाननी केल्यानंतर त्याचा अहवाल पाठविण्यात येईल. साधारण ८०० पेक्षा अधिक खेळाडू विद्यार्थ्यांना या ग्रेस गुणांचा लाभ मिळेल.
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर शारीरिक तंदुरुस्तीसाठी काय सांगाल?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याशिवाय प्रत्येकाने योगा, प्राणायाम, व्यायाम करुन शरीर तंदुुरुस्त ठेवणे आवश्यक आहे. मी स्वत: नियमित योगा, प्राणायाम करतो. प्रत्येकाने चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे.
कोरोनामुळे जिल्ह्यातील क्रीडा घडामोडींवर काय परिणाम झाला?
सुटीचा काळ असल्याने स्पर्धा आयोजनावर परिणाम झाला नाही. मात्र ग्रीष्मकालीन शिबिरे पुढे ढकलण्यात आली आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येताच जिल्ह्यातील क्रीडा उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येईल.
प्रशासनाचे प्रयत्न,नागरिकांचे सहकार्य व लोकप्रतिनिधींची साथ यामुळे आपण कोरोनावर बºयाच अंशी नियंत्रण मिळविले आहे. कोरोना हे जागतिक संकट आहे. यावर मात करण्यासाठी टीमवर्क महत्वाचे आहे. प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी अजून जास्त पालन केल्यास कोरोनावर मात करता येईल.
कोरोनाची जिल्ह्यात परिस्थिती कशी आहे?
जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाबत परिस्थिती खूप नियंत्रणात आहे. आपल्या शेजारी अकोला, औरंगाबाद, जळगाव खांदेशची परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यातुलनेत आपल्या जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. नागरिकांनी अजून जास्त प्रमाणात प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. घरातच थांबा, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका, स्वत:ची, कुटूंबाची काळजी घ्या. जीवापेक्षा जास्त काहीच नाही.जीवन अनमोल आहे. प्रत्येकाने कर्तव्य म्हणून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. नियम पाळण्याची सवय करुन घ्यावी.