दीडशे रुपयांसाठी काढावे लागते हजार रुपयांचे बँक खाते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 12:05 PM2021-07-03T12:05:15+5:302021-07-03T12:05:21+5:30
Buldhana News : विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते काढण्यास सांगण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न देता त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते काढण्यास सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दीडशे रुपयांसाठी बॅंक खाते काढताना चक्क एक हजार रुपये माेजावे लागत आहेत.
शालेय विद्यार्थ्यांना दरदिवशी पोषण आहार वाटप केला जातो. मात्र, कोरोनामुळे यंदा शाळा भरल्या नाहीत. त्यामुळे आहार न शिजवता धान्य वाटप करण्यात आले. आता तर धान्यही न देता पोषण आहाराचे पैसेच थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. उन्हाळ्यात शाळांना सुटी असली, तरी सुटीच्या कालावधीतही पोषण आहार वाटप करणे बंधनकारक आहे. यंदा शाळा बंद असल्याने काही काळ आहाराऐवजी धान्य वाटप करण्यात आले. उन्हाळ्यात धान्य वाटपही शक्य न झाल्याने या आहाराचे थेट पैसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात टाकले जाणार आहेत. त्यासाठी मुलांना बँक खाते काढण्यासाठी एक हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागत आहे.
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत उन्हाळी सुटीच्या कालावधीतील लाभ थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे.
- सचिन जगताप,
प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.