कर्जापायी ‘त्या’ युवकाने गोळी झाडून केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 09:47 AM2021-05-08T09:47:55+5:302021-05-08T09:48:31+5:30
Buldhana News : अर्पण दिनेश मोकळे ऊर्फ सोनू याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकरः शहरातील शाळा क्रमांक - ६ च्या परिसरात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आलेल्या युवकाने कर्जापायी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, मृत युवकासह त्याच्या सहा सहकाऱ्यांनी गुरुवारीच मेहकर शहर परिसरातील हरण टेकडी परिसरात अवैधरीत्या पिस्तूल बाळगून एक फायर केल्याप्रकरणीही पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
मेहकरमधील शाळा क्रमांक - ६ च्या परिसरात अर्पण दिनेश मोकळे ऊर्फ सोनू याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. त्यावरून तपासाची चक्रे फिरविली तेव्हा अर्पण ऊर्फ सोनू याने स्वत:वर गोळी झाडून गुरुवारी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणाच्या चौकशीत पोलिसांना मृत आरोपी व त्याचे सहकारी यांनी प्रारंभी शहर परिसरातील हरण टेकडीवर पिस्तुलातून फायर करून बघितल्याचेही समोर आले आहे. प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये मधुकरराव मोकळे ऊर्फ चिक्कू (३५, रा. पवनसुतनगर), लखनसिंग सरदारसिंग बावरी (२७, रा. अण्णाभाऊ साठेनगर), कृष्णा विजय लहाने (२४, वर्ष रा. शिवाजीनगर), भुवन मंगलसिंग ठाकूर ऊर्फ बंटी (२०, रा. एकतानगर), गोविंद सतीश हेडा (२२), मंगेश गजानन देशमुख (२३, रा. रामनगर) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
मृत अर्पण दिनेश मोकळे ऊर्फ सोनू याच्याविरोधात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अर्पण दिनेश मोकळे ऊर्फ सोनूच्या मृत्यूप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्यात आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण
मेहकर येथील मोहित मधुकरराव मोकळे याने लखनसिंग सरदारसिंग बावरी याच्याकडून अवैधरीत्या गावठी पिस्तूल घेतले होते. मृत अर्पण दिनेश मोकळे हा मोहित मोकळे याचा पुतण्या होता. त्याने हे पिस्तूल सोबत घेत मित्र कृष्णा विजय लहाने, भुवन मंगलसिंग ठाकूर ऊर्फ बंटी, गोविंद सतीश हेडा व मंगेश गजानन देशमुख यांच्यासमवेत जात हरण टेकडी परिसर गाठले. तेथे गोविंद सतीश हेडा याने गुरुवारीच या पिस्तूलमधून एक फायर केले. या घटनाक्रमानंतर अर्पण मोकळे याने शाळा क्रमांक-६च्या परिसरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. कर्जापायी त्याने ही आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक युवराज रबडे यांनी तक्रार दिली असून, तपास पोलीस उपनिरीक्षक जायभाये हे करीत आहेत.