खामगावची तरूणी साकारतेय मालिकेत सप्तश्रृंगी देवीची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 04:50 PM2020-11-10T16:50:55+5:302020-11-10T16:51:06+5:30
Khamgoan News प्रतीक्षा रंगराव देशमुख सध्या खामगाव येथील अमृतबाग सोसायटीत वास्तव्यास आहे.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : एका वाहिनीवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत खामगाव येथील तरूणी प्रतीक्षा देशमुख सप्तश्रृंगी देवीची भूमिका साकारत आहे.
जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा येथील मूळ रहिवासी असलेली प्रतीक्षा रंगराव देशमुख सध्या खामगाव येथील अमृतबाग सोसायटीत वास्तव्यास आहे. प्रतीक्षाला लहानपनापासूनच अभियनाची आवड होती. तिचे महाविद्यालयीन शिक्षण अकोल्यातील राधादेवी गोयंका महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानच तिने विविध नाटकांमध्ये अभिनय केला. युवा महोत्सवातही तिचा हिरीरीने सहभाग राहत होता.
यादरम्यान तिच्या भूमिका बऱ्याच गाजल्या. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या प्रतीक्षाने अभिनय क्षेत्रात करीअर करण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर तिने आयसीआयसीआय बँकेत नोकरी केली.
मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. यावेळी तिने बॅकेची नोकरी सोडली. यादरम्यानच तिच्या चित्रपटसृष्टीतील मित्रांनी तिला दख्खनचा राजा ज्योतिबा नाटकाकरिता ऑडीशन सुरू असल्याचे सांगितले. तिने संबंधितांशी संपर्क केल्यानंतर ऑनलाईन ऑडीशन देण्याचे सांगण्यात आले. ऑनलाईन ऑडीशन दिल्यानंतर तिची निवड झाली. तिला सप्तश्रृंगी देवीची भूमिका देण्यात आली. ही भूमिका प्रतीक्षा साकारत आहे.
यापूर्वी कुठेही अभियनाचे शिक्षण घेतले नाही. प्रत्यक्ष काम करतानाच येत असलेले अनुभव अनमोल असल्याचे तिने सांगितले.
यासोबतच अन्य काही मालिकांच्याही ऑफर आल्या असून, याबाबत विचार करीत असल्याचे प्रतीक्षाने सांगितले.