कर्जाचे आमिष देत युवकाची २ लाखाने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 12:55 PM2021-09-21T12:55:06+5:302021-09-21T12:55:12+5:30
Cyber Crime : २ लाख ५० हजार रुपयांपैकी १ लाख ९९ हजार रुपये एटीएम कार्डचा सीव्हीव्ही क्रमांक तसेच ओटीपी क्रमांक घेऊन काढण्यात आले.
- सुभाष वाकोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कनारखेड : शेगाव तालुक्यातील कनारखेड येथील युवकाला प्रधानमंत्री कर्ज योजनेद्वारे २५ लाख रुपये मंजूर करण्याचे आमिष दाखवून त्याने खात्यात जमा केलेल्या २ लाख ५० हजार रुपयांपैकी १ लाख ९९ हजार रुपये एटीएम कार्डचा सीव्हीव्ही क्रमांक तसेच ओटीपी क्रमांक घेऊन काढण्यात आले. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गावातील सचिन मुकुटराव निळे याने शेगाव ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गावातील सचिन निळे या तरुणाला त्याच्या मोबाईल क्रमांकावर ९७१८९ ७२८६९, आणि ७८३५९ ३३०९७ या दोन क्रमांकांवरून दोघांनी आमिष दाखविले. त्यामध्ये प्रधानमंत्री कर्ज योजनेअंतर्गत २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले जाईल. तसेच त्यासाठी बँकेमध्ये खाते उघडून त्या खात्यामध्ये २.५० लाख रुपये जमा करण्याचे सांगितले. त्या दोघांनी सांगितल्याप्रमाणे सचिनने रक्कम आयसीआयसीआय बँकेत खाते उघडून जमा केली.
आरोपीने २४ ऑगस्ट २०२१ ते १४ सप्टेंबर २०२१ च्या दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान सचिन याच्या एटीएम कार्डचा सीव्हीव्ही क्रमांक तसेच ओटीपी क्रमांक विचारले. त्यावेळी व्यवहार करून १ लाख ९९ हजार रुपये खात्यातून काढले. ही बाब लक्षात येताच फसवणूक झाल्याचे सचिनला समजले. त्यामुळे आशिष कुमार मिश्रा आणि अरुण जैन या दोघांच्या मोबाईल क्रमांकावरून त्याला काॅल आल्याने दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ४२० भादंवी ६६ (क) ( ड) माहिती तंत्रज्ञान सुधारणा अधिनियम २००८ अन्वये शनिवारी १८ सप्टेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिलीप वडगावकर करीत आहेत.