तरुणाचा विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू
By योगेश देऊळकार | Published: May 5, 2023 07:20 PM2023-05-05T19:20:50+5:302023-05-05T19:21:33+5:30
या घटनेने धानोरा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
योगेश देऊळकार, जळगाव जामोद : तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील १८ वर्षीय तरुणाचा विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना ४ मे रोजी घडली. या घटनेने धानोरा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
धानोरा महासिद्ध येथील १८ वर्षीय तरुण मयूर संदीप सोनोने ३ मे रोजी पुण्यावरून कुटुंबीयांच्या भेटीकरीता आला होता व परत ४ मे रोजी संध्याकाळी पुण्याला जाणार होता. त्याचे आई-वडील मजुरीसाठी कामाला गेले होते. त्यामुळे मयूर घरी एकटाच असताना दुपारच्या सुमारास घरासमोरून जात असलेल्या विद्युत प्रवाहाचा त्याला जोरदार धक्का लागल्याने तो जमिनीवर पडला. ही बाब लक्षात येताच त्याच्या घराशेजारी राहणारे विजय वाकोडे यांनी मयूरला उपचारासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी इसीजी काढून मयूरला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या लेखी एमएलसी मेमोवरून पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर देवचे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला मर्ग दाखल केला. मृत मयूर सोनोनेच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ व बहीण असून त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.