विसर्जनासाठी गेलेला युवक कोयना नदीपात्रात वाहून गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 11:46 AM2019-09-12T11:46:21+5:302019-09-12T11:47:01+5:30
आगाशिवनगर येथील घटना
मलकापूर : घरगुती गणपती विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा कोयना नदीपात्रात वाहून गेल्यामुळे बुडून मृत्यू झाला. आगाशिवनगर येथील मलकापूर पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ जाधव पानवठ्यावर सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कोयना नदीच्या पाण्याला प्रवाह असल्यामुळे संबंधित युवकाचा मृतदेह शोधण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
चैतन्य उर्फ चेतन विजय शिंदे ( वय २२, रा. काका शिंदे कॉलनी, आगाशिवनगर , मलकापूर ता. कराड ) असे नदीत बुडालेल्या युवकाचे नाव आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चैतन्य शिंदे हा भाऊ गणेशसह दोन मित्रासोबत गुरूवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घरगुती गणपती विसर्जनासाठी गेला होता. आगाशिवनगर येथील मलकापूर पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ असलेल्या जाधव पानवठ्यावर गणेशमुर्तीचे विसर्जन करत असताना चैतन्यचा पाय घसरून कोयना नदीपात्रात पडला. कोयना नदीच्या पाण्याला प्रवाह असल्यामुळे तो प्रवाहाबरोबर वाहत गेला. पोहता येत नसल्यामुळे चैतन्य नदीत बुडत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी इतरांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले.
मात्र, पाण्याला जास्त प्रवाह असल्यामुळे काही अंतरातच तो नदीपात्रात बुडाला. शोधाशोध करूनही तो सापडला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी घाटनास्थळी धाव घेतली. त्याचा शोध घेण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न सुरू आहे. शोधकार्यासाठी महाबळेश्वर येथील ट्रेकर्सला पाचारण करण्यात आले आहे. यावेळी पानवठ्यावर आगाशिवनगर येथिल युवकांसह नागरिकांची गर्दी झाली होती.