कोल्हापुरी बंधाऱ्यात बुडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 11:10 AM2021-05-30T11:10:18+5:302021-05-30T11:10:32+5:30
Buldhana News : युवकाचा पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकरः मित्रा समवेत सारंगपूर शिवारात गेलेल्या एका युवकाचा पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मृत युवक हा सहा मे रोजी हरणटेकडी परिसरात पिस्तूलमधून फायर केल्या प्रकरणात आरोपी होता.
भूवन मंगलसिंग ठाकूर उर्फ बंटी (२०) असे कोल्हापुरी बंधाऱ्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. शुक्रवारी तो मित्रांसह सारंगपूर शिवारात गेला होता. तेव्हा या बंधाऱ्यात तो बुडाला. त्याचा त्यावेळी मित्रांनी शोध घेतला मात्र तो सापडला नाही. याची त्याच्या कुटुंबियांनाही माहिती देण्यात आली होती. शनिवारी पुन्हा कोल्हापुरी बंधाऱ्यात त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह सापडला. मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी डॉ. वैभव नागोलकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राथमिकस्तरावर आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
दुसरीकडे ६ मे रोजी मेहकर येथील एका शाळेच्या परिसरात मृतक बंटीचा मित्र दिनेश मोकळे उर्फ सोनू याने पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली होती.
आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केली असल्याचे त्यावेळी पोलिसांनी तपासानंतर सांगितले होते. मात्र या घटनेपूर्वी मृतक दिनेश मोकळे आणि कोल्हापुरी बंधाऱ्यात बुडून मृत्यू झालेला बंटी व त्यांच्या काही मित्रांनी ६ मे रोजीच हरणटेकडी परिसरात अवैधरित्या बाळगलेल्या पिस्तूलातून हवेत एक गोळी झाडली होती. त्यात सातही जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.