मलकापुरातील युवकाचा नळगंगा धरणात बुडून मृत्यू, नागपूर उच्च न्यायालयात करत होता प्रॅक्टिस
By सदानंद सिरसाट | Published: March 26, 2024 04:40 PM2024-03-26T16:40:36+5:302024-03-26T16:41:13+5:30
लि. भो. चांडक विद्यालयाच्या मागे वसलेल्या परिसरातील रहिवासी अलोकसिंह दिनेशसिंह ठाकूर (२४) हा एलएलबी पदवी घेतल्यानंतर गतकाळात नागपूर उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होता. तिथेच करिअर करायचे, असे त्याने स्थानिक सहकाऱ्यांना सांगितले होते.
मलकापूर (बुलढाणा) : येथील युवा विधिज्ञ तथा नागपूर उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या २४ वर्षीय युवकाचा नळगंगा धरणात बुडून मृत्यू झाला. सोमवारी धुळवडीच्या दिवशी बुडालेल्या युवकाचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला आहे.
लि. भो. चांडक विद्यालयाच्या मागे वसलेल्या परिसरातील रहिवासी अलोकसिंह दिनेशसिंह ठाकूर (२४) हा एलएलबी पदवी घेतल्यानंतर गतकाळात नागपूर उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होता. तिथेच करिअर करायचे, असे त्याने स्थानिक सहकाऱ्यांना सांगितले होते.
धुळवडीच्या दिवशी सोमवारी दुपारी अलोकसिंह हा त्याच्या मित्रांसोबत नळगंगा धरणावर गेला, सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्याने पाण्यात उडी घेतली. त्यानंतर तो पाण्याबरोबर आलाच नाही. तो बुडाल्याचे लक्षात येताच सहकारी मित्रांनी आरडाओरडा केला. त्यातच गोताखोरांना पाचारण करण्यात आले. मात्र, त्याचा थांगपत्ता लागला नाही.
मंगळवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. सकाळी ८ वाजताच्या सुमारास अलोकसिंहचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी मृतदेह तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला. या घटनेची माहिती कळताच असंख्य लोकांनी रुग्णालयात गर्दी केली. नळगंगा धरणाचा जलसाठा घटलेल्या आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी असतानाही अलोकसिंह याचा मृत्यू झाला. त्याठिकाणी पाणी पातळी आठ ते दहा फूट इतकी आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू पाण्यात बुडाल्यावर झटके आल्याने झाला असावा, असा अंदाज आहे. तर अलोकसिंहच्या अकाली मृत्यूने त्याच्या सहकाऱ्यांना हादरा बसला आहे.