बालिकेवर बलात्कार प्रकरणी युवकास १० वर्षाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 02:06 PM2019-04-13T14:06:40+5:302019-04-13T14:07:44+5:30
खामगाव : १४ वर्षीय बालिकेला पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी युवकास खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली.
खामगाव : १४ वर्षीय बालिकेला पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी युवकास खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली.
जळगाव जामोद तालुक्यातील वडपानी येथील १४ वर्षीय बालिका ८ मे २०१४ रोजी रात्री साडेआठ वाजता तिच्या चुलत भावाच्या घरून टी.व्ही पाहून घरी जात असताना, गावातीलच कालू लक्ष्मण राऊत (२२) याने तीचे तोंड दाबून मुंबईला पळवून नेले. या प्रकरणात मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीसांनी आरोपी कालू राऊत विरूध्द भादंविच्या कलम ३६३, ३६६, ३७६ (२) तसेच बालकांचे लैंगिक शोषण कायदा २०१२ च्या कलम ३,४ नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलीसांनी आरोपीला १२ मे २०१४ रोजी अटक केली. तपासाअंती पोलीसांनी खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणात ११ जणांची साक्ष घेण्यात आली. साक्षीदारांच्या साक्षीनंतर अतिरिक्त जिल्हा तथा सत्र न्यायालयाचे न्यायधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपी कालू राऊत याला भादंविच्या कलम ३६३ अंतर्गत ३ वर्षांची शिक्षा तसेच ५०० रूपये दंड, दंड न भरल्यास १ महिन्याची शिक्षा, भादंविच्या कलम ३६६ नुसार ५ वर्षांची शिक्षा तसेच १००० रूपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त २ महिने शिक्षा, भादंविच्या कलम ३७६ (२) तसेच इतर कलमान्वये १० वर्षांची शिक्षा व २ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिन्यांची शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा आरोपीला एकाचवेळी भोगाव्या लागणार आहेत. या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता रजनी बावस्कार यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)