धावत्या ट्रकखाली युवकाने घेतली उडी! नैराश्यातून संपविले जीवन; पिंपळगाव राजा येथे खळबळ
By अनिल गवई | Published: September 14, 2022 09:25 PM2022-09-14T21:25:05+5:302022-09-14T21:26:10+5:30
रस्त्यावर वर्दळीच्या वेळेत एका युवकाने चक्क ट्रकखाली उडी घेऊन जीवन संपविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: रस्त्यावर वर्दळीच्या वेळेत एका युवकाने चक्क ट्रकखाली उडी घेऊन जीवन संपविले. ऐन दुपारी घडलेल्या या घटनेमुळे खामगाव तालुक्यातील पिंपळगावराजा येथे एकच खळबळ उडाली आहे. नैराश्यातून युवकाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. तत्पूर्वी या युवकाला ट्रकने धडक दिल्याची चर्चा होती. मात्र, रस्त्यावरील एका दुकानात लागलेल्या सीसी कॅमेऱ्यामुळे या घटनेचा उलगडा झाला.
शाहबाज अब्दुल रफीक असे मृतक युवकाचे नाव आहे. पिंपळराजा- खामगाव रस्त्यावरील स्टेट बँकेजवळ दुपारी हा युवक बराच वेळ उभा होता. दरम्यान, दुपारी या रस्त्याने एक कंटेनर जात होते. त्यावेळी कंटेनरचा समोरील भाग पुढे गेल्यानंतर मागील चाकामागे उडी घेतली. मागील चाकांमध्ये चिरडल्यागेल्याने त्याने प्रचंड आरडाओरड केली. आवाज ऐकून प्रत्यक्षदर्शी कंटेनरच्या दिशेने धावले. अनेकांना कंटेनरने धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाल्याचा समज झाला. त्याचवेळी काहींनी तातडीने त्याला खामगाव येथील रूग्णालयात हलविले. येथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. मृतक शाहबाज हा पिंपळगाव राजा येथील कांदा व्यापारी रफीक भाई यांचा मुलगा होता. घटनेनंतर खामगाव- पिंपळगाव राजा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या युवकाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे घटनेचा उलगडा
खामगाव तालुक्यातील बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव राजा येथे दुपारच्यावेळी झालेल्या या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. नागरिक संतप्त झाल्यामुळे चालकाने काही समजण्याच्या आतच कंटेनरमधून उडी घेत, घटनास्थळ सोडले. त्याचवेळी काहींनी शाहबाजने आत्महत्या केल्याचे पोलीसांना सांगितले. त्यादिशेने तपास सुरू केल्यानंतर रस्त्यावरील एका दुकानात लागलेल्या सीसी कॅमेºयातील फुटेजची पाहणी केली. त्यावेळी या घटनेचा उलगडा झाला.
पिंपळगाव राजा येथील घटना अपघात नसून आत्महत्या आहे. घटनेसंदर्भातील सीसी फुटेज प्राप्त झाले आहेत. यात युवकाने ट्रकखाली उडी घेतल्याचे दिसून येत आहे. तपासाअंती याप्रकरणी आत्महत्येची नोंद घेतली जाईल. - सतिश आडे
ठाणेदार, पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा.