ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार; दुसरबीड राज्य महामार्गावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 05:34 PM2018-03-12T17:34:16+5:302018-03-12T17:36:01+5:30
दुसरबीड (जि. बुलडाणा ): भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीस धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ११ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता राज्यमहामार्गावर घडली.
दुसरबीड (जि. बुलडाणा ): भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीस धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ११ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता राज्य महामार्गावर घडली. दुसरबीड येथील युवक संदीप आंबादास सांगळे हा रविवारी रात्री आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच. २८ एन ८७८९ ने किनगांव राजावरून घरी दुसरबीडला येत असताना राज्य महामार्गावरील गितांजली मंगल कार्यालयाजवळ मेहकरवरून येत असलेल्या ट्रक क्रमांक एम.एच. ४६ १५६१ याने भरघाव ट्रक चालवून संदीपच्या दुचाकीला समोरा समोर धडक दिल्याने संदीप सांगळे जागीच ठार झाला. अपघात एवढा भीषण होता की संदीपची दुचाकी ट्रकने दोन कि़मी. अंतरापर्यत फरफटत नेली. सदर प्रकार राहेरी येथील आनंद देशमुख यांच्या निदर्शनात आल्याने त्यांच्या माहितीवरून सिंदखेड राजा पोलिसांनी ट्रक त्यांच्या हद्दीत ताब्यात घेतला असून चालक फरार झाला आहे. याबाबत राजू रामराव घुगे वय ३५ वर्ष रा. दुसरबीड यांच्या फिर्यादीवरून किनगांव राजा पोलीसांनी कलम २७९, ३०४ (अ) भांदवी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास किनगांव राजा ठाणेदार जनार्धनशेवाळे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल अशोक मांटे, पोलिस कॉन्स्टेबल जाकीर पठाण करीत आहे. मृतक संदिप यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.