स्फोटामध्ये युवक गंभीर
By admin | Published: February 1, 2016 02:24 AM2016-02-01T02:24:24+5:302016-02-01T02:24:24+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील घटना; विहीर खोदकाम करताना घडली घटना
बुलडाणा : धाड परिसरात येणार्या भडगाव येथे शेतात विहिरीचे खोदकाम करीत असताना ब्लास्टिंगमुळे १७ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी भडगाव येथे घडली. भडगाव येथील योगेश गणेश साखरे (१७) हा शेतात आपल्या सहकार्यांसोबत विहिरीचे खोदकाम करीत होता. दरम्यान, विहिरीत खडक लागल्याने तो फोडण्यासाठी ब्लास्टिंग लावण्यासाठी योगेश आपल्या सहकार्यासोबत खाली उतरला. बार लावल्यानंतर सहकारी वर आले व योगेश खाली विहिरीतच राहिला. सर्व जण वर आल्याची खात्री न करता ब्लास्ट करण्यात आला. या ब्लास्टमध्ये योगेश हा गंभीर जखमी झाला. योगेशने विहिरीतून आवाज दिल्यानंतर सहकार्यांना याबाबत माहीत झाले. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. योगेशच्या सहकार्यांनी त्याला तातडीने बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ औरंगाबाद येथे हलविण्यात आले. दरम्यान, ब्लास्टिंग मालकाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याने ब्लास्टिंग मालकावर गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणी योगेशचे वडील गणेश साखरे यांनी केली आहे. या घटनेमुळे भडगाव शिवारात एकच खळबळ उडाली होती.