जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले
By admin | Published: September 22, 2015 01:59 AM2015-09-22T01:59:01+5:302015-09-22T01:59:01+5:30
देऊळगाव वायसा; शिक्षकांच्या सर्मथनार्थ ग्रामस्थांचे आंदोलन.
लोणार (जि. बुलडाणा): महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी देऊळगाव वायसा जि.प. शाळेवरील निलंबित शिक्षक संजय प्रल्हाद जायभाये यांच्या सर्मथनार्थ ग्रामस्थांनी २१ सप्टेंबरला शाळेला कुलूप ठोकून आंदोलन केले. देऊळगाव वायसा जि.प. शाळेवर गत आठ वर्षांपासून संजय प्रल्हाद जायभाये हे कार्यरत असून, त्यांच्या प्रयत्नाने जि.प.शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली. २७ ऑगस्ट २0१५ रोजी शाळेवरील त्या शिक्षिकेने वर्गातील विद्यार्थिनीस मारहाण केली. म्हणून दुसर्या दिवशी २८ ऑगस्ट रोजी विद्यार्थिनीचे पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी शिक्षिकेविरुद्ध मुख्याध्यापक यांच्याकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली. त्यावरून मुख्याध्यापक यांनी शाळेतील सर्व शिक्षकांची सभा बोलावली. या सभेत महिला शिक्षिका व शिक्षक संजय प्रल्हाद जायभाये यांच्यात वाद झाला. दरम्यान, शिक्षक संजय जायभाये यांनी महिला शिक्षिकेस ईल भाषेत शिवीगाळ करून विनयभंग केल्याची तक्रार लोणार पो.स्टे.ला २८ ऑगस्ट २0१५ दिली. त्यावरून पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर त्याच दिवशी महिला शिक्षिका या दुपारच्या सुट्टीत जेवनानंतर वर्गातील विद्यार्थ्यांना आपला डब्बा व ताट धुवायला लावतात न धुतल्यास विद्यार्थ्यांना मारहाण करतात, अशी तक्रार मारहाण केलेल्या विद्यार्थिनीने व तिच्या पालकांनी लोणार पो.स्टे. ला नोंदवली. त्यावरून शिक्षिकेविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.