जिल्हा परिषद सदस्य शरद हाडेंची शिवसेनेतून हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 03:04 PM2020-01-22T15:04:30+5:302020-01-22T15:04:35+5:30
खा. प्रतापराव जाधव यांनी जिल्हा परिषद गट नेता आशिष रहाटे यांच्या मार्फत व्हीप बजावला होता. मात्र शरद हाडे यांनी व्हीपचे उल्लंघन करुन सभागृहात गैरहजर राहले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदांच्या निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पक्षादेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी सवणा जिल्हा परिषद गटाचे सदस्य शरद हाडे यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. २१ जानेवारी रोजी झालेल्या सभेत हा प्रकार उघड झाल्याने तडकाफडकी शिवसेना पक्षाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान शरद हाडे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्वही रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. त्यातच २१ जानेवारी रोजी जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदाची निवडणूक झाली. त्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना पक्ष समाविष्ठ आहे. मात्र पक्षाने बजावलेल्या व्हीप विरोधातच शरद हाडे यांनी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले.
बुलडाणा जि.प.मध्ये चार विषय समिती सभापती पदासाठी निवडणूक पारपडली. यात महाविकास आघाडीच्या पुनम विजय राठोड, ज्योती अशोक पडघान, राजेंद्र सदाशिव पळसकर, रियाज खान इलियास खान पठान यांना उमेदवार म्हणून मतदान करण्यासाठी शिवसेना सदस्यांना जिल्हा संपर्क प्रमुख खा. प्रतापराव जाधव यांनी जिल्हा परिषद गट नेता आशिष रहाटे यांच्या मार्फत व्हीप बजावला होता. मात्र शरद हाडे यांनी व्हीपचे उल्लंघन करुन सभागृहात गैरहजर राहले होते.