दारू पिणाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेलाच बनविले अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:21 AM2021-07-05T04:21:58+5:302021-07-05T04:21:58+5:30
लोणार पंचायत समितींतर्गत येणाऱ्या आय.एस.ओ. नामांकित जिल्हा परिषद केंद्रीय उच्च माध्यमिक मराठी प्राथमिक शाळेची अत्यंत दुर्दशा झाली आहे. या ...
लोणार पंचायत समितींतर्गत येणाऱ्या आय.एस.ओ. नामांकित जिल्हा परिषद केंद्रीय उच्च माध्यमिक मराठी प्राथमिक शाळेची अत्यंत दुर्दशा झाली आहे. या शाळेचा उपयोग मद्यपींकडून अवैध कामांसाठी केला जात आहे. आठवीपर्यंतची ही शाळा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद आहे.
शाळा बंदचा गैरफायदा घेत गावातील मद्यपी हे शाळेच्या गेटवरून उड्या मारून शाळेत प्रवेश करतात. शाळेत दारू पीत बसतात. त्यामुळे शाळेचा परिसरही या लोकांनी अस्वच्छ केला आहे. गुटखा पुड्या खाऊन कचरा टाकतात. रिकाम्या झालेल्या दारूच्या बाटल्या तिथे फेकून देतात, फोडतात. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच कचऱ्याचा ढीग साचलेला असून त्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. शाळेच्या २०० मीटर परिसरामध्ये अवैधरीत्या तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा विक्री जोमात सुरू आहे. शाळेत लावलेल्या झाडांची व केलेल्या सावली मंडपाची नासधूस झाली आहे. या सर्व प्रकाराकडे स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे. उपसरपंच विषाणू सरकटे यांनीही या प्रकरणाला दुजोरा दिला आहे.
गावात दारू येते कोठून?
शाळा बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थी दारूच्या व तंबाखूजन्य पदार्थाच्या आहारी गेले आहेत.
गावात एकही शासनमान्य देशी दारूचे दुकान नसताना दारूच्या बाटल्या गावात पोहोचतात कशा? आणि मद्यपीच्या हातात मिळतातच कशा? हे पोलीस प्रशासनासमोर अव्हान आहे.
मुख्याध्यापकांकडून कारवाईचा इशारा
जिल्हा परिषद शाळेतील या प्रकाराबाबत मुख्याध्यापक गो.मा. पवार यांनी शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर शाळेत घाण करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
काय म्हणतात ग्रामस्थ?
शाळा सुरू होण्याआधी शाळा स्वच्छ करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असून प्रशासनाने याची जबाबदारी पार पाडावी, असे मत नागनाथ दादाराव अण्णा सरकटे यांनी व्यक्त केले आहे. शाळेचे पावित्र्य राखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने व ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सतीश नरवाडे यांनी केली आहे.