जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात!
By admin | Published: July 11, 2017 12:01 AM2017-07-11T00:01:12+5:302017-07-11T00:01:12+5:30
विद्यार्थी शोधमोहीम सुरू : शिक्षक अडचणीत, अतिरिक्त होण्याची भीती
किशोर मापारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : सध्या शहरी भागातील शाळांच्या शिक्षकांनी ग्रामीण भागातील गाव, वाडी, तांड्यावर फिरून विद्यार्थ्यांची शोधमोहीम सुरू केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. ग्रामीण भागातील पालकांचा आपल्या पाल्यांना शहरातील नामांकित शाळांमध्ये दाखल करण्याकडे अधिक कल दिसत आहे. यामुळे नामवंत व गुणवान उच्चपदस्थ विद्यार्थी घडविणाऱ्या जिल्हा परिषद शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
मागिल काही वर्षात आपल्या मुलांनाही शहरातील मुलांप्रमाणे इंग्रजी शाळेत शिकला पाहिजे, या शिक्षणाच्या धावत्या युगात इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत असायला पाहिजे, म्हणून ग्रामीण भागातील पालक मुलांच्या शिक्षणासाठी गाव, घरदार सोडून मुले ज्या शहरात शिक्षण घेत आहेत, त्याच शहरात राहून मोलमजुरी करून आपल्या पाल्याला शिक्षण देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या ही दिवसेंदिवस घटत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची वाटचाल ही डिजिटल होण्याकडे कल असतानाही अनेक शाळांना विद्यार्थीच मिळत नसल्यामुळे दिसून येते. वाढत्या स्पर्धेला तोंड देत शाळा सुरू ठेवण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने शिक्षकांची विद्यार्थी शोध मोहीम सुरू आहे. विद्यार्थी संख्या कमी झाल्यास तुकडीची मान्यता रद्द होण्याची भीती असते. परिणामी, काही शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा मोठा धोका हा या शिक्षकांवर ओढावू शकतो. एकेकाळी जिल्हा परिषद शिक्षकाला संपूर्ण गाव आदर्श मानून त्यांना मोठा सन्मान देत होते.
काळाच्या ओघात नोकरी टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शोधात दारोदार फिरण्याची वेळ आता याच शिक्षकांवर आली आहे, तर ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, असे पालक मात्र ग्रामीण भागातीलच शाळेत पाल्यांना ठेवण्यासाठी आग्रही आहेत; पण येथील शाळांना हे विद्यार्थीच मिळत नसल्यामुळे या शाळांचेच आता अस्तित्व धोक्यात आलेले आहे.
तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शौचालय व स्वच्छतागृहांचा अभाव असून, शाळांचे कुंपण गायब झाले आहे. त्यामुळे जनावरे शाळेच्या परिसरात मुक्त संचार करताना दिसून येतात. डागडुजीअभावी अनेक शाळांच्या भिंती पडण्याच्या स्थितीत असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
-राजेश मापारी,
जिल्हा परिषद सदस्य, लोणार.