जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 11:05 AM2021-08-07T11:05:23+5:302021-08-07T11:05:29+5:30

Zilla Parishad teacher transfers canceled : यंदाच्या सत्रात बदल्याच होणार नसल्याने शिक्षकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. 

Zilla Parishad teacher transfers canceled | जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या रद्द

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या रद्द

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव : गेल्या दोन वर्षांपासून बदल्यांची प्रक्रियाच न झाल्याने दुर्गम गावातील अनेक शिक्षक यंदा बदली प्रक्रियेकडे आस लावून बसले होते. मात्र, यावर्षी बदली प्रक्रिया रद्द झाली आहे. त्यामुळे यंदाच्या सत्रात बदल्याच होणार नसल्याने शिक्षकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. 
राज्य शासनाने बदली प्रक्रिया ऑनलाईन केल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकदाच जिल्हांतर्गत बदल्यांचा लाभ शिक्षकांना मिळाला. त्यात तांत्रिक कारणांमुळे अनेकांवर अन्याय झाल्याची ओरड आहे. कारण नसताना अनेकजण दुर्गम गावांमध्ये अडकून पडले. 
गेल्या वेळी विस्थापित झालेले शिक्षक आतुरतेने बदली प्रक्रियेची वाट पाहात आहेत. गेल्या वर्षी सुरू झालेली बदली प्रक्रिया कोरोनाच्या कारणाखाली ऐनवेळी रद्द करण्यात आली. यावर्षीही सुरुवातीला ग्रामविकास विभागाने बदलीचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र, ३ ऑगस्ट रोजी सध्या शिक्षकांच्या बदल्या न करण्याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा सध्या कोरोनामुळे प्रत्यक्ष सुरू करणे शक्य नाही.
राज्यस्तरावरून ऑनलाईन पद्धतीने बदली प्रक्रिया होणार आहे. मात्र, युती सरकारच्या काळातील बदली पोर्टलमध्ये चुका असल्याचे सांगत महाविकास आघाडी सरकारने नवे पोर्टल तयार करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु नवे पोर्टल नेमके कधी तयार होणार, याबाबत निश्चित नाही. दुसरीकडे शिक्षकांमधून विनंती बदल्या जिल्हास्तरावरच समुपदेशनाद्वारेच तातडीने करण्याची मागणी जोर धरत आहे. 
जिल्हा परिषदेतील अन्य विभागांच्या कर्मचाऱ्यांसह खुद्द शिक्षण विभागातील पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच झाल्या. दरवेळी शिक्षकांच्या बदल्या साधारण जूनपूर्वी म्हणजेच प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यापूर्वी केल्या जातात. त्यामुळे नव्या सत्रात शिक्षकांना नवी शाळा ‘जॉईन’ करणे सोपे जाते. विद्यार्थ्यांसाठीही ते  सोयीचे ठरते. मात्र,  यावर्षी बदली प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. 

Web Title: Zilla Parishad teacher transfers canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.