3 चुका : त्या कराल तर नवीन जॉब मिळणं तर सोडाच, आहे त्या नोकरीतही मिळेल डच्चू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 05:43 PM2017-11-20T17:43:23+5:302017-11-20T17:44:22+5:30
नवी नोकरी शोधणं चुकीचं नाही, पण ती शोधताना अत्यंत कॉमन चुका केल्या तर आहे त्या नोकरीतही नारळच मिळेल!
आहे त्या नोकरीत मन न रमणं, नवीन चांगल्या कामाची, जास्त पगाराची नोकरी मिळावी असं वाटणं यात काही चूक नाही. पुढे जाण्याची संधी सगळ्यांनाच मिळायला हवी. मात्र ती पुढची संधी शोधताना आहे तिथं आपला पाय गाळात जातोय का याकडे जरा लक्ष द्या. अनेकदा आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं कळतं, आपण चुकूच शकत नाही. पण अतीआत्मविश्वासामुळे आणि सोकॉल्ड कम्युनिकेशन स्किलमुळे आपण काही अत्यंत बावळट चूका करुन बसतो आणि त्यामुळे आपली आहे ती नोकरीही जायची वेळ येऊ शकते. तसं होऊ नये म्हणून या 3 चुका टाळाच!
1) वर्क इमेलने पाठवताय सीव्ही?
आपल्या लक्षातही येत नाही पण आपल्या आहे त्या नोकरीचा जो कार्यालयीन कामाचा इमेल आयडी असतो त्यानं आपण दुसरीकडे नोकरीसाठी अर्ज करतो. सीव्ही पाठवतो. त्यानं दोन गोष्टी होतात. पहिली म्हणजे त्या लोकांच्या हे लक्षात येतं की, हा माणूस पुरेसा प्रोफेशनल नाही. गंभीर नाही. कामात लक्ष नाही. आपलं इम्प्रेशन तिथंच मातीत जातं.
दुसरं म्हणजे जिथं आपण काम करतो तिथले लोक आपली मेल ट्रेस करु शकतात आणि आपण इथं धड काम करत नाही असा आपला पोलखोल होऊच शकतो.
2) बॉसच्या तक्रारींचा पाढा
नसेल आपल्याला आवडत आपला बॉस. लाख तक्रारी असतील. लाख वाईट वागत असेल तो आपल्याशी. पण ऑनलाइन इण्टरव्ह्यू देताना, मेल लिहिताना बॉसच्या तक्रारींचा पाढा वाचू नये. त्याला शिव्या देऊ नये. जग छोटं असतं, ती नोकरी मिळाली नाही पण बॉसला आपली ही कर्तबगारी समजली तर आहे त्या नोकरीत बॅण्ड वाजेल!
3) लोचट प्रेमप्रदर्शन
आपण कसे कॉन्फिडण्ट आहोत हे दाखवण्यासाठी इमेलमध्ये लोचट प्रेमप्रदर्शन, ओव्हर फ्रेण्डली भाषा वापरु नका. कायमची फुली बसू शकते आपल्यावर हे लक्षात ठेवा.